जिल्हाधिकारी यांची रामनगर प्रतिबंधित क्षेत्राला भेट

वर्धा : वर्धा शहरातील रामनगर भागातील एक व्यक्ती कोरोना बाधित झाल्यामुळे येथील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आज प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन येथील नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्यात. रामनगर येथे मंगळवारी ५९ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर या भागाला कंटेंमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. तसेच या भागातील हाय रिस्क मधील व्यक्तींचे स्त्राव नमुने कोरोना तपासणीला पाठविण्यात आले होते. त्या आठही व्यक्तींचे तपासणी अहवाल नेगेटिव्ह आले आहेत.

आज जिल्हाधिकारी यांनी या भागातील सर्व नागरिकांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी त्यांनी नागरिकांशी सुद्धा संवाद साधून जीवणावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित होतोय की नाही याबाबत विचारपूस केली. तसेच हा भाग आणखी १० दिवस असाच बंद राहील त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. नागरिकांनी जीवणावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत यावेळी समाधान व्यक्त केले. या भागात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याबाबत सांगताना त्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्याच्याही सूचना केल्यात. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, पोलीस निरीक्षक झलक, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ किमया गंधे व डॉ टेकाम उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *