महावितरणची कारवाई योग्य ठरवत दोषी ग्राहकाने महावितरणला पैसे देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : अवाजवी वीज बिल येत असल्याची तक्रार करून महावितरणच्या विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागणाºया ग्राहकाची तक्रार फेटाळत वीज पुरवठा खंडित करण्याची महावितरणची कार्यवाही योग्य असल्याचा निर्णय ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला असून ग्राहकाच्या तक्रारीमुळे महावितरणला करावा लागलेला खर्च ग्राहकाकडून त्याच्या वीज बिलाच्या माध्यमातून वसूल करण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले आहे. वीज ग्राहक मुश्ताक इक्बाल खान हे वाणिज्यिक ग्राहक आहेत. त्यांनी महावितरणने अवाजवी वीज बिल दिले तसेच महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची दिलेली नोटिस बेकायदेशीर असून ती रद्द करावी व वीज कायद्यांतर्गत २० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती ग्राहक निवारण तक्रार निवारण मंचकडे केली होती.

महावितरणच्या वतीने महाल विभागाचे कार्यकारी अभियंता व नोडल अधिकारी समीर टेकाडे यांनी महावितरणची बाजू सक्षमपणे मांडली. महावितरणने ग्राहकाला नवीन वीज जोडणी दिली. त्यांनतर वीज मीटरचे रीडिंग घेण्यासाठी मीटर रीडर गेले असता ग्राहकाचे दुकान बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्राहकाला सरासरी वीज बिल देण्यात आले. मात्र ग्राहकाने वीज बिलाचा भरणा न केल्याने ग्राहकाला नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस मोबाईलवरपाठविण्यात आली, ही वस्तुस्थिती असे टेकाडे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या निर्दशनास आणून दिली. ग्राहक मंचाने वीज ग्राहकाने दिलेले कागदपत्रे तपासले असता आॅगस्ट २०२१ ते जानेवारी २०२२ या दरम्यान ग्राहकाचे दुकान बंद असल्याचे स्पष्ट झाले. तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये रिडींग घेतल्यानंतर परत मार्च २०२२ ते जुलै २०२२ या दरम्यान दुकान बंद असल्याचे आढळून आले. या काळात वीज ग्राहकाने वीज बिल न भरल्याने ग्राहकाचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. त्यानंतर ग्राहकाने एकूण वीज बिलापैकी ५ हजार रुपये भरले त्यामुळे ग्राहकाचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला.

तसेच दुकान बंद असल्याच्या काळातील वीज बिल महावितरणकडून सरासरी पद्धतीने नियमानुसार देण्यात आले आहे, असे स्पष्ट करत ग्राहक मंचाने ग्राहकाची याचिका फेटाळली. तसेच या सर्व प्रक्रियेत ग्राहकाने विनाकारण ग्राहक मंचाकडे दाद मागितली. त्यामुळे यात ग्राहक दोषी असून ग्राहकाने महावितरणला २०० रुपये द्यावेत व हे पैसे ग्राहकाच्या वीज बिलातून वसूल करण्यात यावेत असे ग्राहक मंचाने आपल्या आदेशात म्हटले आहे. ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती ए. ए. सैय्यद यांच्या मंचाने हा आदेश दिला असून मंचच्या सदस्य म्हणून डॉ. कल्पना तिवारी उपाध्याय तर सदस्य सचिव म्हणून नरेश पारधी यांनी काम पहिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.