नियमबाह्य गतिअवरोधकांमुळे अपघाताला निमंत्रण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : नियमबाह्य तसेच न रंगविलेल्या गतिरोधकांमुळे अनेक वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. मुह्यय रस्ते आणि गल्लीबोळांतील मार्गांवरील वाहतुकीची सारखीच परिस्थिती आहे. वाहनांचा वेग मर्यादित असेल तर वाहनचालकांना या गतिरोधकांमुळे कोणताही त्रास होत नाही. मात्र, पालिकेकडून शहरातील रस्त्यांवर वाट्टेल तिथे आणि कसेही गतिरोधक बसविले आहेत. पालिका खासगी ठेकेदारांकडून रस्त्यांवर गतिरोधक टाकण्याचे काम करुन घेते. मात्र ते कोणतेही निकष पाळत नसल्याने रस्त्यांवरील गतिरोधक मोठा अडथळा निर्माण करीत आहेत.

वाहने सरळ या गतिरोधकावर आदळत आहेत. त्याचबरोबर पालिकेने लावलेल्या रस्त्यांवरील नियमबाह्य गतिरोधकांना दर्शक पट्टे नसल्याने अनेकवेळा हे गतिरोधक दिसून न आल्याने वाहनांचे अपघात होत आहेत.पालिकेकडून करण्यात आलेले एक टक्काही गतिरोधक नियमात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यमार्गांसह शहरातील गल्लीबोळांत गतिरोधकांचे अनावश्यक जाळे पसरले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या इच्छेनुसार गतिरोधक बसविले जातात. गतिरोधकांची उंचीही प्रमाणीत उंचीपेक्षा अधिक असल्याने दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत. अधिकतर वाहने रात्रीच्या वेळेस गतिरोधकांवरुन आदळत असल्याचे दिसून येत आहेत.

यात दुचाकीवर मागे बसलेल्या महिला, नागरिक खाली पडून जखमी होत आहेत. शहरातील गतिरोधकांची पाहणी करून नियमांनुसार गतिरोधक तयार करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नियमानुसार किती अंतरावर व कोणत्या रस्त्यावर गतिरोधक असावेत याची माहितीच प्रशासनाला नाही. शहरातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, बाजारपेठांतील रस्त्यांवर तर गतिरोधक आहेतच. त्याशिवाय शहरातील गल्लीबोळांतील रस्त्यांवरदेखील गतिरोधक करण्यात आलेले आहेत. याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.