अवकाळीचा कहर, नुकसानीचे पंचनामे करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. लाखांदूर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यामुळे धान, मका, भाजीपाला, फळबाग, आंबे बाग आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर घर व गोठ्यांची ही पडझड झाली आहे. शेतक-यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला व बळीराजाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकºयांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने यांनी केली आहे.

साकोली तालुक्यात अवकाळी पावसामुळे धान पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला पिकात पाणी शिरून भाजीपाला पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई झालेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. साकोली तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकाचे पंचनामे करुन नुकनासभरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद भंडाराचे समाज कल्याण सभापती मदन रामटेके यांनी यांनी केली आहे. साकोली तालुक्यातील भैया श्रीरंगे, निदेश नगरिकर, राजकुमार कापगते, जगदीश नगरीकर, विनायक कटकवार, मोतीराम नगरीकर, लक्ष्मण कापगते, विनोद गोबाडे, सुधीर गोबाळे, अरविंद कटनकर, किशोर कापगते, रमेश कापगते तसेच तालुक्यातील इतर शेतकºयांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून तात्काळ नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मोबदला देण्याची मागणी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मदन रामटेके यांनी केली आहे.

मोहाडी तालुक्यात सतत ८ दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केली आहे. अवकाळी पाऊस, वादळवाºयामुळे उन्हाळी धानाचे, मिरची बाग, फळबाग, भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली. या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून तातडीने शेतकºयांना एकरी २५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यातयावी तसेच घराची पडझड झालेल्यांना २० हजार रुपयाची आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, मोहाडी तालुक्यातील मोहाडी, डोंगरगाव, आंधळगाव, पाचगाव, आंधळगाव, करडी, बेटाळा, कांद्री या क्षेत्रातील अनेक गावात घरांची पडझड झाली व शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. सततच्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावलेला आहे. सध्या उन्हाळा सुरू असतानाही पावसाळा सुरू झाल्यासारखे वाटत आहे. अश्या परिस्थितीत शेतकºयांचे पंचनामे होणे महत्वाचे आहे. परंतु अद्याप महसूल व कृषी विभागाकडून कारवाही शून्य आहे. आधीच कर्जात बुडालेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाणार आहे. शेतकºयांना मदत व्हावी म्हणून तात्काळ शेतीचे, घरांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.