समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात येऊ नये

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात येऊ नये, यासंदर्भाचे निवेदन आज, ९ मे रोजी समग्र ब्राम्हण सभेतर्फे राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. निवेदनानुसार, विवाह ही एक प्राचीन संस्था आहे. सर्व धर्मातील समाजांनी आपापल्या समजुती व अनुभवाच्या जोरावर विवाह व कुटुंबाची ही संस्था स्थापन केली असून त्यासाठी नियम व कायदे केले. सुसंघटित सुसंस्कृत समाजासाठी विवाह व कुटुंब या संस्थेचे पालनपोषण केले.

प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या विवाह कुटुंब संस्थेची संकल्पना, स्वरूप, कर्तव्ये, कायदेशीर प्रतिबंध इ. ठामपणेप्रस्थापित आहेत. भारत हा विविध धर्म, जाती, पोटजातींचा देश आहे. मानव समाजात पुरुष आणि स्त्री यांच्यातील विवाहाला मान्यता दिली आहे. विवाह संस्था ही केवळ दोन विरुद्ध लिंगांचे मिलन नव्हे तर मानवजातीची प्रगती देखील आहे. सर्व धर्मांमध्ये फक्त दोन विरुद्ध लिंगी व्यक्तींच्या लग्नाचा उल्लेख आहे. विवाह हे दोन भिन्न लिंगांचे पवित्र मिलन म्हणून ओळखण्यासाठी विकसित झालेल्या भारतीय समाजानेपाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या दोन पक्षांमधील करार किंवा संमती मान्य केलेली नाही.

भारतात विवाहाला सांस्कृतिक महत्त्व आहे आणि विवाहाची महान आणि काल-परीक्षित संस्था कमकुवत करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना समाजाने तीव्र विरोध केला पाहिजे. भारतीय सांस्कृतिक सभ्यतेवर शतकानुशतके सतत प्रहार होत आले आहेत, तरीही ती टिकून आहे. आता स्वतंत्र भारतात पाश्चिमात्य विचार, तत्त्वज्ञान आणि प्रथा आपल्या सांस्कृतिक मुळांवर लादल्या जातात, जे या राष्ट्रासाठी व्यावहारिक नाही. विवाह संस्थेतील दुरुस्तीचे काम लोकसभा, विधानसभांवर सोडले तर बरे होईल. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचाविचार करण्याचे ठरवले तरी घाईघाईने तसे केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंता समग्र ब्राम्हण सभेने निवेदनातून व्यक्त केली आहे. निवेदन देताना विनोद हिरडे, अतुल दुबे, सचिन (बंटी) मिश्रा, प्रकाश उमाळकर, जयंत शुक्ला, दीपक बोबडे, अमित झा, मुकेश मिश्रा, संजीव बापट, ओमप्रकाश तिवारी, नितीन गोखले आदी उपस्थित होते.

नागपुरात लेस्बियन तरुणीची आत्महत्या

नागपूर : नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घरात कुणी नसताना तिने सिलिंग फॅनला दोरी बांधून आयुष्याचा शेवट केला. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या आत्महत्येचं नेमकं कारण सुसाईड नोटमधून समोर आलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मृत विद्यार्थिनी ही नागपूरमधील एका नामांकित महाविद्यालयात कला शाखेच्या दुसºया वर्षात शिकत होती. तर तिचे वडील केंद्र सरकारमध्ये नोकरीला होती.

तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ती लेस्बियन (समलैंगिक) असल्याचे नमूद केले आहे. एका मुलाबरोबर लग्न करून सुखी जीवन जगणे तिला शक्य नसल्याचेही तिने म्हटले आहे. मनाविरुद्ध जगण्यापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल, असेही तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. तसेच समलिंगी समुदायातील लोकांनाही याचा धक्का बसला आहे. अशाप्रकारे एखाद्या समलैंगिक तरुणीने आत्महत्या केल्याची ही नागपूर शहरातील वर्षभरातील दुसरी घटना आहे.

मार्चमध्ये, एका तृतीयपंथी व्यक्तीने आपल्या मैत्रिणीला मुलाशी लग्न करण्यापासून रोखल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केली होती. ताज्या घटनेबाबत अधिक माहिती देताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन विठोले यांनी सांगितले की, आपण समलैंगिक (लेस्बियन) असल्याचे कळाल्यानंतर पीडित मुलीने याबाबतची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. पण आई-वडिलांनी तिला पाठिंबा दिला नाही. तसेच तिने मुलाबरोबर लग्न करावं, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. यामुळे पीडित तरुणी नैराश्यात गेली. यातूनच तिने रविवारी घरात कुणी नसताना सिलिंग फॅनला दोरी बांधून आत्महत्या केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.