आज ग्रामपंचायत पोट निवडणुक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात आज गुरुवार १८ मे रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींतील २९ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. शुक्रवार १९ मे रोजी गोंदिया व तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड विशेष सभाद्वारे केली जाणार आहे. सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया कृषी उत्पन्न बाजार समितीसह संस्था व ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा मुहूर्त दीर्घ प्रतीक्षेनंतर निघाला. मागील महिन्यात २८ व ३० तारखेला जिल्ह्यातील सात बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या. आता सभापती-उपसभापती निवडीच्या तारखा जिल्हा निवडणुक विभागाने जाहीर केल्या आहेत. या निवडीकडे शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे. सातही बाजार समित्यांना विशेष सभा घ्यावी लागणार आहे.

त्यानुसार, शक्रवार १९ मेरोजी गोंदिया व तिरोडा बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी विशेष सभा, अर्जुनी मोर २३ मे, आमगाव व देवरी २४ मे, सडकअर्जुनी २६ मे तर गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी सभा बोलाविण्यात आली आहे. तिरोडा, गोरेगाव, देवरी व आमगाव येथे भाजप समर्थित पॅनलने वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. अर्जुनी मोर भाजप व महा विकास आघाडीचे समान सदस्य निवडून आले आहेत. गोंदिया बाजार समितीत अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या परिवर्तन पॅनलचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत.

आता सभापती व उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यातील २६ ग्राम पंचायतींमधील रिक्त झालेल्या २९ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक १८ मे रोजी होत आहे. यातील १४ जागांसाठी फक्त एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्या जागा अविरोध झाल्या आहेत. तर एका जागेसाठी फक्त एकच उमेदवारी अर्ज होता व तोही अवैध ठरल्याने तसेच तीन जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे अशा एकूण चार जागांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.