दुसºयांदा मुलगी झाली म्हणून दिला ‘तीन तलाक’

प्रतिनिधी चंद्रपूर : समाजसुधारणेसाठी अनेक कायदे निर्माण झाले असले तरी अजूनही या अनिष्ट चालीरीती सुरूच आहेत. फक्त त्याची वाच्यता जाहीररितीने केली जात नाही. यामुळे अशा घटना समोर येत नाहीत. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. ‘तीन तलाक’वर कायदा आणून सरकारने या प्रथेवर बंदी आणली आहे. तरी देखील पत्नीने दुसºयांदाही मुलीला जन्म दिला याचा राग ठेवत पत्नीला तलाक देण्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात अशाप्रकारची समोर येणारी ही पहिलीच घटना आहे. मुस्लिम समाजातील पीडित महिलेचा विवाह जामीन अली या व्यक्ती सोबत १२ फेब्रुवारीला २०१५ ला मुस्लीम रितीरिवाजा नुसार झाला होता. लग्नानंतर पीडिताला जामीन अलीपासून दोन मुली झाल्या. त्यात मोठी मुलगी मरियम तीन वर्षांची तर लहान मुलगी रुबी एक वषार्ची आहे.

यापूर्वी देखील माहेरून पैसे आणण्यासाठी सासरचे लोक तगादा लावत होते. मात्र, दुसरीही मुलगी झाल्याने या महिलेचा छळ सुरू झाला. माहेरून तीन तोळे सोने माहेरुन आणावे म्हणून तिच्यावर दबाव टाकून तिला मारझोड केली जाऊ लागली. पीडितेचा दीर शाहबाज अली तिच्यावर वाईट नजर टाकत होता. त्याबद्दल तिने पतीला सांगितले, मात्र उलट तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिलाच मारझोड करण्यात आली. जानेवारी २०२० ला तब्येत खराब झाल्याने पीडिता माहेरी आली. त्यानंतर मार्चला ती परत गेली असता तिला घरी घेण्यास सासरच्यांनी नकार दिला. पतीने तिला मारझोड करून हाकलून लावले. यानंतर ती लग्नात मध्यस्थी करणारे ताहीर अली यांच्या घरी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे गेली. यादरम्यान देखील तिने सासरच्या लोकांना घरी येण्याची विनंती केली. मात्र, ती त्यांनी धुडकावून लावली. ती सासरी आली असता तिची तीन वर्षीय मुलगी मारियम हिला बळजबरी सासरच्यांनी घेऊन गेले.

जोवर तलाक देत नाही तोवर मुलीला परत देणार नाही, अशी धमकी तिला देण्यात आली. मात्र, दोन मुलींचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न तिच्यासमोर होता. याच दरम्यान पतीने १०० रु च्या स्टॅम पेपरवर पोस्टाने तलाक पाठविले. त्यात तीन साक्षीदारांच्या सह्या ही आहेत. विशेष म्हणजे जेव्हा की असे करणे कायद्याने गुन्हा असला तरी असे करण्यात आले. या प्रकरणात पीडित महिलेने वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *