सोयाबीन तेल साठा जप्त : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

प्रतिनिधी नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने १५ जुलै रोजी नागपूर येथे शंकर ट्रेडिंग कंपनीवर धाड टाकून १ लाख ३९ हजार ६४७ रुपये किंमतीचा रिफाईन्ड सोयाबिन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहआ युक्त अन्न यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन नागपूर कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १५ जुलै रोजी मे. शंकर ट्रेडिंग कंपनी, प्लॉट क्र.१५, तेलीपुरा, नेहरु पुतळा, इतवारी, नागपूर या पेढीवर धाड टाकली असता पेढीचे मालक शंकर विनायकराव दुरुगकर हे रिफाईन्ड सोयाबिन तेल या खाद्यतेलाची पूनर्वापर केलेल्या १५ किलो/लिटरच्या टिनमध्ये रिपॅकिंग करुन टिनला नामांकित कंपनी उदाहरणार्थ फॉरच्युन, किंग्ज इत्यादी कंपनीचे बनावट लेबल व टिकली लावून खाद्यतेलाचे टिन सिलबंद करुन त्याची विक्री करीत असल्याचे व ग्राहकांची फसवणुक करीत असल्याचे आढळले. पेढीकडून रिफाईन्ड सोयाबिन तेल (फॉर्च्युन) १९३.४ लिटर एकूण किंमत १७ हजार १६४ रुपये, रिफाईन्ड सोयाबिन तेल (किंग्ज) ११५३.४ किलो एकूण किंमत ९५ हजार १५५ व रिफाईन्ड सोयाबिन तेल (खुले) ३५८.४ किलो एकूण किंमत २७ हजार ३२८ रुपये असे एकूण १ लाख ३९ हजार ६४७ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

या साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणास्तव घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल. उपरोक्त कार्यवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रफुल्ल टोपले व विनोद धवड यांनी केली आहे. सणासुदीच्या दिवसांचा विचार करता खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्याने अन्न व औषध प्रशास नातर्फे धडक मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास त्याबाबत प्रशासनाचे दूरध्वनी क्रमांक (०७१२) २५६२२०४ वर माहिती देवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशास नाचे सह आयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *