अपारंपरिक ऊर्जावर भर देणार

प्रतिनिधी मुंबई : राज्यात वसुंधरा व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पारंपरिक ऊर्जेवरील राज्याची निर्भरता कमी करण्यासाठी राज्यात सौर ऊर्जेवर आधारित अपारंपारिक ऊर्जा निर्मिती करण्यावर अधिक भर देण्यात येईल अशी घोषणा ऊर्जामंंत्री डॉ. नितीन राऊत यांनी इंडो फ्रेंच चेंबर आॅफ कॉमर्सच्या ई बैठकीत केली. राज्यात सौरऊर्जा प्रकल्प मोठया प्रमाणावर राबविण्यासाठी इंडो फ्रेंच चेंबर आॅफ कॉमर्स यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉ नितीन राऊत यांनी आज मंत्रालयातून संवाद साधला. राज्याला नुतनीकरण ऊर्जा प्रकल्प क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व नवीन सौरऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी प्रधान उर्जा सचिव यांच्या नेतृत्वाखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत. हे धोरण ठरविण्यासाठी गुजरात व राजस्थान मॉडेल्सचा अभ्यास करण्यात येणार आहे.

राज्यात पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प कसे राबविता येईल, यासाठी सरकार व ऊर्जा कंपनीच्या सध्याच्या पडीक जमिनी तसेच खासगी जमिनीवर हे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात येईल. त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम राबविण्यात येणार आहे. हरित योजनेअंतर्गत शासनाकडून पडीक जागा विकत घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यात येणार असून प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सिंगल विंडो प्रक्रिया करून कामे तडीस नेण्यात येणार आहे. मुंबई येथील फ्रेंच वाणिज्य दूतावासच्या सोनिया बारब्रि व अणुऊर्जा सल्लागार थॉमस मीएस्सेट यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ऊर्जामंत्री समवेत महानिर्मितीच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक शैला ए व महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *