रुलर मार्टच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना : अ‍ॅड. यशोमती ठाकूर

प्रतिनिधी गोंदिया : ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. त्या केवळ संघटित नाही तर त्यांनी उद्योग-व्यवसाय सुरू केले आहे. बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी रुलर मार्टच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. रुलर मार्टच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला आणखी चालना मिळण्यास मदत झाली आहे. असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी केले. २९ जुलै रोजी गोंदिया येथील सिव्हिल लाईन भागात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सहाय्याने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, गोंदियाच्या वतीने सुरू करण्यात रुरल मार्टचे उदघाटन करतांना आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आमदार सहसराम कोरोटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. अ‍ॅड. श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, महिला ह्या संघटित झाल्यामुळे त्या वस्तूची आणि साहित्याची निर्मिती करू लागल्या आहेत.

बचतगटातील महिला भगिनींना ताकद देण्याचे काम महिला व बालविकास विभाग निश्चितपणे करेल असा विश्वास व्यक्त करून त्या पुढे म्हणाल्या, महिलांमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आहे. त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे काम महिलांनी करावे, यासाठी त्यांना निश्चितपणे मदत करण्यात येईल. कुटुंबाच्या अर्थका- रणात महिलांचा हातभार लागत असल्याचे त्या म्हणाल्या. प्रारंभी अ‍ॅड.श्रीमती ठाकूर यांनी दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. रुरल मार्टमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्याची पाहणी केली. कापडी मास्क तयार करणाºया बचतगटातील महिला तसेच अन्य साहित्य निर्मिती करणाºया महिलांशी त्यांनी संवाद साधला.

बचतगटातील उत्पादित केलेल्या काही वस्तूंची खरेदी देखील त्यांनी केली. तसेच नोंदणी वहीमध्ये आपला अभिप्राय देखील नोंदविला. शुभारंभ झालेल्या रुलर मार्टमध्ये गोंदिया, सालेकसा, तिरोडा, देवरी, आमगांव, गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील ५४ महिला बचतगटांनी तयार केलेल्या ७५ प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे. यामध्ये विविध शोभिवंत लाकडी वस्तू ,बांबू आर्ट, गोंडी पेंटिंग, मायक्रोन वस्तू, कापडी बॅग, कापडी मास्क, पायदान, बांगड्या, विविध प्रकारची लोणची पापड, कुरड्या, चकल्या तसेच विविध प्रकारच्या डाळी यासह अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, जिल्हा उपजीविका व्यवस्थापक हेमंत मेश्राम, राम सोनवणे, प्रफुल अवघड, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक मोनिता चौधरी तसेच तालुका अभियान कक्ष तिरोडा आणि सालेकसा येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *