महिला व बाल विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-अ‍ॅड.यशोमती ठाकूर

प्रतिनिधी गोंदिया : महिला व बालकांच्या विकासासाठी अनेक योजना आहेत.जिल्ह्यातील महिला व बालकांचे जीवनमान उंचविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा.असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले. गोंदिया जिल्हा परिषद येथील सभागृहात आज २९ जुलै रोजी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महिला व बाल विकास योजनांचा आढावा अ‍ॅड. ठाकूर यांनी घेतला .यावेळी त्या बोलत होत्या.

आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, आमदार सहसराम कोरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले,महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एच.डी गणवीर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अ‍ॅड. ठाकूर म्हणाल्या, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना कोरोनाच्या कामातून वगळावे. त्यांना पूर्णवेळ अंगणवाडीचे काम करू द्यावे. ज्या अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त झाल्या आहेत,त्यांना एकरकमी लाभ द्यावा. अंगणवाडीतून महिला व बालकांना पोषण आहार वेळेत दिला जावा.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही त्वरित करावी. जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रासाठी असलेली डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना प्रभावीपणे राबवावी. जिल्ह्यातील महिला व बालकांचे प्रश्न एकाच छताखाली सोडविण्यासाठी बाल विकास भवन उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या. अंगणवाडीमधून ज्या महिला आणि बालकांना पोषण आहार पुरवि ण्यात येतो त्याचा पुरवठा योग्य प्रकारे होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगून ठाकूर म्हणाल्या, जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्या जीर्ण झाल्या आहेत तेथे नवीन इमारत उभारणीसाठी कंपन्यांच्या उत्तरदायित्वाचा अर्थात सीएसआरचा निधी उपलब्ध करून घ्यावा.

जिल्ह्यातील रिक्त असलेली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील पदांची माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकर करता येईल. देवरी,सालेकसा आणि अजुर्नी/ मोरगाव या नक्षलग्रस्त तालुक्यात रिक्त असलेली पर्यवेक्षिकां ची पदे भरण्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मानव विकास कार्यक्रम व महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस अंतर्गत १ कोटी २५ लाख २६ हजार रुपयांचा धनादेश जिल्ह्यातील पाच लोकसंचालित साधन केंद्रांना २८ ग्राम संस्थांमार्फत ९१५अति गरीब कुटुंबांना आणि तेरा बचतगटांना जे कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहे अशांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप अ‍ॅड. श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच जिल्ह्यातील ४३ बचतगटांना १ कोटी ३९ लाख ८० हजार रुपये गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत देण्यात आले त्या धनादेशाचे वाटप बचतगटांच्या महिलांना यावेळी अ‍ॅड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

माविमच्या जिल्हा कार्यालय गोंदियाच्या सन २०१९ -२० या आर्थिक वषार्तील वार्षिक प्रगती अहवाल पुस्तिकेचे विमोचन अ‍ॅड. श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गणवीर यांनी दिली. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व त्याच्या प्रगतीबाबतची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. सोसे यांनी दिली.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री पौनीकर यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात असलेल्या योजनांची माहिती व जिल्ह्यात कोणकोणत्या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे याची माहिती देखील दिली.यावेळी महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तीनही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *