मौख्यिक आरोग्याबाबत जनजागृती करावी : जिल्हाधिकारी

प्रतिनिधी भंडारा : मौख्यिक आरोग्याचे आजार लहान मुले व तरुण वर्गात दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात शिक्षकांना प्रशिक्षण देवून शाळेत लहान मुलांमध्ये तंबाखू व तांबाखुजन्य पदार्थाचे सेवनास प्रतिबंध करण्याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम.जे प्रदीपचंद्रन यांनी दिल्या. मौख्यिक आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावे, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व मौख्यिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधूरी माधुरकर, डॉ. गौरी बरवट, डॉ. शैलेश कुकडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, पोलीस अधिकारी गजानन कंकाडे, दंत शल्य चिकित्सक डॉ. मनिष बत्रा, सामाजिक कार्यकर्ता आरती येरणे, तृप्ती बोभाटे, अ. वि. भानारकर, व्ही.पी. तांबे, मुकूंद ठवकर, डॉ. जगदीश लेंडे उपस्थित होते.

राष्ट्रिय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाचे लहान मुलांमध्ये व तरुणामध्ये व्यसनाचे प्रमाण खुप वाढत आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे. जेणे करुन या आजाराविषयी मुलांमध्ये जनजागृती करण्यास मदत होईल. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाºयावर जास्तीत जास्त चालान करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत २०१८-१९ मध्ये ५३७ लोकांवर चालान करुन १४ हजार ७२ रुपये, २०१९-२०२० मध्ये १ हजार २१५ लोकांवर चालान करुन ५६ हजार ५८२ रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा सल्लागार डॉ. शैलेश कुकडे यांनी दिली. कमी वयात लहान मुलांमध्ये दातांची कीड खूप जास्त प्रमाणात आढळून येत आहे.

पीट अँड फीशर सीलेंट कार्यक्रम चांगल्या व योग्य पध्दतीने राबविण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. त्या अंतर्गत शाळेच्या ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे मौख्यिक आरोग्याची तपासणी करुन ज्या विद्यार्थ्यांच्या दाढेत कीड लागण्याची शक्यता दिसत आहे. त्यांना पीट अँड फीशर सीलेंट भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना व शिक्षकांना त्याची माहिती दयावी व शाळेच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मौख्यिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करुन आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, आशा सेविका तसेच इतर विभागांना प्रशिक्षण देण्याचे सांगण्यात आले. जिल्हास्तरावरील अहवाल सादर करतांना दंत चिकित्सक डॉ. मनिष बत्रा यांनी ई-दंत सेवा हेल्प लाईन १८००-११-२०३२ वर करावा व ई-दंत सेवा हेल्प लाईनचा वापर करण्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *