कोवीड रुग्णांची तात्काळ ओळख पटावी म्हणून सर्वेक्षणावर भर द्या

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता सद्यस्थितीमध्ये तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज ७ आॅगस्ट रोजी पंचायत समिती सभागृह तिरोडा येथे तिरोडा तालुक्यातील कोरोना परिस्थीतीचा आढावा जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत घेण्यात आला.

या सभेत होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, कोविड केअर सेंटर, रुग्णांना नेण्याकरिता अम्बुलन्सची सुविधा, साधनांची उपलब्धता, रुग्णांचा सर्वे इत्यादी बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. सभेला उपविभागीय अधिकारी गंगाराम तडपाळे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, तिरोडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश मोटघरे, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कांचन रहांगडाले, डॉ.इंद्रिस शेख, नोडल अधिकारी नागेश लोणारे तसेच तिरोडा तालुक्यातील आरोग्य विभागाचे आणि तिरोडा नगर पालिकेचे सर्व पर्यवेक्षक यावेळी उपस्थित होते.

खवले यावेळी म्हणाले की, वेळच्या वेळी रुग्ण शोधणे हा कोविड परिस्थिती हाताळण्यावरचा उत्तम उपाय आहे. जेवढ्या लवकर रूग्णाची ओळख पटेल तेवढ्या लवकर त्यावर उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे सर्वेक्षणांमधून रुग्णांची ओळख पटवणे यावर भर द्या असे निर्देशही त्यांनी या सभेमध्ये दिले. सभेमध्ये तिरोडा तालुक्यात करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसोबतच ईली रुग्ण सर्वेक्षणाचा सखोल आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *