प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक : डॉ. नितीन राऊत

नागपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील मात्र प्रकल्पग्रस्तांनी कोविड आणि लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाला वेठीस धरू नये, चर्चेसाठी पुढे यावे, चिमणीवरून खाली यावे, जेणेकरून चचेर्तून समस्येचे समाधान निघेल असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज ऊर्जा अतिथी गृह बिजलीनगर नागपूर येथील बैठकीत केले. महानिर्मिती प्रकल्पग्रस्तांच्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपुरात तातडीने प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलावली व त्यात चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार सुरेश धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. मात्र, प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी न्याय मिळेपर्यंत चिमणी खाली उतरणार नाही असे अडवणुकीचे धोरण स्वीकारले, त्यामुळे बैठक यशस्वी होऊ शकली नाही.

बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रकल्पग्रस्तांना समजावून सांगण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आंदोलकांनी आपल्या न्याय मागण्या मांडाव्या आणि शासनाला सहकार्य करावे अशी भूमिका मांडली. विशेष म्हणजे, चंद्रपूरच्या दोन्ही आमदारांनी आणि खासदारांनी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींना वारंवार विनंती केली कि आंदोलकांना शासनाला सहकार्य करून आपल्या न्याय मागण्या मांडाव्या अशी भूमिका मांडली. मात्र, प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींनी आमदार, खासदार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विनंतीला असहमती दर्शवली. स्वत: उर्जामंत्री सायंकाळ पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या निर्णयाची वाट बघत होते. परंतु प्रकल्पग्रस्त आपल्या निर्णयावर ठाम अडून बसले आहेत. सदर बैठकीला व्हिडीओ कॉन्फरसिंग मार्फत उर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, प्रधान सचिव उर्जा असीम गुप्ता, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शैला ए, महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे प्रामुख्याने सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *