साठे कुटुंबियांचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडून सांत्वन

भं.प्र. प्रतिनिधी नागपूर : पुत्र वियोगाचे दु:ख हे न पेलवणारे आहे, काळजी घ्या, आम्ही आपल्या सोबत आहोत. या शब्दांत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज विंग कमांडर दीपक साठे यांच्या आई-वडीलांना धीर दिला. कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज पालकमंत्र्यांनी भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच काका काकू यावेळी उपस्थित होते.

विंग कमांडर दीपक साठे यांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव धोक्यात घालुन इतर प्रवाशांचे प्राण वाचवले. नागपूरच्या या सुपुत्राचा नागपूरकरांना नेहमी अभिमानच राहील असे पालकमंत्री म्हणाले. टेबलटॉप असलेल्या विमानतळावरच्या लँडिंग करतेवेळी अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती त्यांची आई नीला साठे यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *