गोंदियातील प्रकल्पांनी गाठला तळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : मागील हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांनी सरासरी ओलांडली. रब्बी हंगामात अनेक प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यानंतरही अनेक प्रकल्पांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक साठा शिल्लक होता. परंतु अद्यापही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नसल्याने आणि तप्त उन्हामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला आहे. आज स्थितीत जिल्ह्यातील ६० प्रकल्पांमध्ये प्रकल्पांमध्ये केवळ २४.६८ टक्के साठा शिल्लक आहे. गोंदिया जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प, २३ लघु प्रकल्प व ३८ जलसाठवण प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला.

बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी व कलपाथरी या मध्यम प्रकल्पात ३०.१९ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत या प्रकल्पामध्ये १०.३८ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यातील २३ लघू प्रकल्पांमध्ये आजघडीला २१.०४टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या कालावधीत लघू प्रकल्पांमध्ये ६.०१ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यातील ३८ जुने मामा तलावांत आज स्थितीत १४.५३ टक्के जलसाठा असून मागील वर्षी ८.७० टक्के जलसाठा होता. जिल्ह्यातील ६० मध्यम, लघू व मामा प्रकल्पांमध्ये आजघडीला २४.६८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला यासाठी प्रकल्पांमध्ये ७१ टक्के साठा शिल्लक होता.

यातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उर्वरित साठ्याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग झाला. मृग नक्षत्र संपत आला तरी पावसाने जिल्ह्यात अद्यापही हजेरी लावली नसल्याने आणि पडत असलेले कडक उन्हामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्यानू आज या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु आता १३० गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केले आहे. आज जिल्ह्यात कुठेही टँकरने पाणीपुर-वठा होत नसला तरी येत्या काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ उद्भवू शकते, ही बाब नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील मध्यम, लघू व जुने मालगुजारी प्रकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत तीन पट जलसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून प्राप्त अहवालात नमूद माहितीवरून स्पष्ट होते. मागील वर्षी ६० प्रकल्पांत आज तारखेला ८.४३ टक्के जलसाठ्याची नोंद होती. यंदा २४.६८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

२० दिवसांत ४ मिमीच पाऊस

मागील वर्षी जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. परंतु यंदा तसे पहायला मिळाले नाही. १ ते २० जून या कालावधीत जिल्ह्यात १२४.७ मिमी पाऊस बरसने अपेक्षित होते. या कालावधीत केवळ ४ मिमी पावसाची नोंद झाली. टक्केवारीचा विचार केल्यास केवळ ३.१ आहे. गतवर्षी याच कालावधीत ६६.५ मिमी पाऊस बरसला होता हे टक्केवारी ५१.८ एवढी होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.