अकरावीत अधिकच्या प्रवेशाला मंजुरी टाळावी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यात अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश देताना निर्धारित केलेल्या विद्यार्थी संख्येपेक्षा अधिकच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. अशा अधिकच्या प्रवेशास मंजूरी प्रदान करू नये, अशी मागणी विदर्भ ज्यूनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा) ने केली आहे. याविषयीचे एक निवेदन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना देण्यात आले. निवेदनानुसार शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये काही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान शाखेत निर्धारित केलेल्या विद्यार्थी संख्येपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्याचा परिणाम इतर कनिष्ठ महाविद्यालये विशेषत: कला शाखेच्या तुकड्यांवर होत आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या व जिल्हा परिषदेच्या अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहायीत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा शालेय प्रशासनाला निर्धारित संख्येपेक्षा वाढीव विद्यार्थी प्रवेश बंद करण्याचे सूचित करावे, तसेच वाढीव विद्यार्थ्यांना किंवा प्रतीक्षा यादीला मंजुरी प्रदान केल्यास विजुक्टातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना विजुक्टाचे अध्यक्ष प्रा. मार्तंड गायधने, सचिव प्रा. राजेंद्र दोनाडकर, प्रा. संग कोहपरे, डॉ. ज्ञानेश्वर गौपाले, प्रा. मधुसूदन किरणापूरे, प्रा. उत्तम मेंढे, प्रा. सुभाष गोंधळे, सुनील सावरकर, वाय.जी. बांबोडे , डी. एल. राऊत यासह विजुक्टाचे अन्य सदस्य उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.