परसवाडा येथील पूल ठरतो धोकादायक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : तुमसर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ सिहोरा गावाशी परसवाडा (सि.) गावाचा थेट संपर्क जोडणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. त्या मार्गावर गाव शिवारातून वाहणारा मोठा नाला आहे. ऐन पावसाळ्यात थोडा पाऊस आला तरी पुलावर पाणी चढते. त्यामुळे कमी उंचीचा हा पूल विद्यार्थी व नागरिकांना रहदारीला धोक्याचा ठरत आहे.

पावसाळ्यात नाला ओसंडून वाहतो, ज्यामुळे या गावाचा संपर्क मुख्य बाजारपेठ सिहोराशी पूर्णत: तुटतो. पुलावरून गुडघाभर पाणी वाहते. मात्र जीव मुठीत घेऊन गावकरी तसेच शालेय विद्यार्थी पुलावरून प्रवास करतात. पुलावर पाणी चढून वाहतुकीसाठी बंद झाल्यास गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळ्यात या गावांची कोंडी झाल्यासारखी परिस्थिती असते.

गेल्या अनेक वर्षांपासून समस्येची स्थानिक प्रशासन व संबंधित विभाग साधी दखल घेत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया वृत्तपत्र प्रतिनिधीशी बोलताना परसवाडाच्या सरपंचा सौ. सीमा लखन मोरे यांनी व्यक्त केली.

लेखी पाठपुराव्याला दुजोरा

ग्रामस्थांनी सदर पूल धोकादायक असून त्या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, याबाबत पंचायत समितीला अनेकदा लेखी पाठपुरावा केला. प्रवासाकरिता पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थी व नागरिकांची कोंडी होते. गतवर्षी पावसाळ्यात येथे अनेक दुर्घटना घडल्या. दोन-चार वेळा गावाचा संपर्क तुटला होता. परंतु अजूनपर्यंत उपाययोजना न झाल्याने गावकºयांत नाराजीचा सूर असून रोष व्यक्त करीत आहेत.

पुलाची उंची वाढविण्याची गरज

पावसाळ्यात हा नाला ओसंडून वाहतो. त्यामुळे थोड्या पावसानेही नाल्याचे पाणी पुलावर चढते. त्यामुळे या ठिकाणी जास्त अधिक उंची असलेल्या पुलाचे बांधकाम करण्याची गरज आहे. पावसाळ्यात पुलालगतच्या शेतशिवारात सुद्धा पाणी शिरते. त्यामुळे या कामाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी सरपंच सिमा मोरे सह पिंटू हुड, अमोल जंजार, डॉ. पद्माकर राऊत, लखन मोरे, ऋषी मुळे, महेंद्र मेश्राम, वामन मुळे तथा गावकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.