विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विजय वडेट्टीवार याची वर्णी लागली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत केली. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद रिक्त होते. पक्ष फुटीनंतर राकाँचे संह्ययाबळ कमी झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसची सदस्य संख्या जास्त असल्याने हे पद काँग्रेसकडे चालून आले. त्यामुळे या पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नावांची चर्चा सुरू होती. अखेर काँग्रेसश्रेष्ठींनी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी १ आॅगस्ट रोजी अध्यक्षांना पत्र देऊन, विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली. त्याअनुषंगाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वडेट्टीवार यांची आज विरोधी पक्षनेतेपदी निवड करीत असल्याचे घोषित केले. सभागृहाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी त्यांना विरोधी पक्षनेत्याच्या आसनावर आसनस्थ करून, अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.