झाडाखाली बसून विद्यार्थी घेताहेत शिक्षण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जुन्या काळात शिक्षण व संस्कार यांचे धडे गुरुकुल किंवा आश्रम मधून दिले जायचे त्याकाळी गुरुवर्य आपल्या शिष्यांना एका झाडाखाली बसून हे शिक्षण द्यायचे असे आपण वाचलेले आहे. महाभारत मालिकेत पाहिलेसुद्धा आहे. पण आज प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही असे होत असेल तर यावर विश्वास बसत नाही. पण खरे आहे, गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा केंद्राअंतर्गत येणाºया गोंदेखारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या जीर्ण असल्यामुळे शाळेतील ४८ विद्यार्थी निंबाच्या झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत. असे असले तरी अजूनपर्यंत शिक्षण विभागाकडून कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदेखारी येथे तीन वर्गखोल्यांची इमारत व एक अंगणवाडीची इमारत आहे. त्यापैकी दोन वर्गखोल्या व अंगणवाडीची इमारत पूर्णत: जीर्ण झाल्या आहेत. स्वयंपाक खोलीदेखील जीर्ण झाली आहे. एक वर्गखोली विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य आहे; पण मुख्याध्यापक, शिक्षक कार्यालय, अलमारी व इतर साहित्य या वर्गखोलीत ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे शाळेच्या आवारात असलेल्या निंबाच्या झाडाखाली ४८ विद्याथ्यांना बसवून शिक्षणाचे धडे दिले जात आहे. नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी शालेय आवारात जागा उपलब्ध नसल्याने जीर्ण वर्गखोल्यांना पाडल्याशिवाय पर्याय नाही. या शाळेकडे अधिकारी, केंद्रप्रमुख, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचेही दुर्लक्ष आहे.

शिक्षण, पोषण आहार, शाळा परिसर स्वच्छता याकडे देखील दुर्लक्ष होत असून ही शाळा समस्याग्रस्त आहे. दरम्यान, या शाळेकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, उपाययोजना करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. ‘वर्गखोल्या जीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना निंबाच्या झाडाखाली बसवावे लागते. जीर्ण इमारत पाडण्यासाठी जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केले आहे’, असे गोंदेखारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खुमेंद्र टेंभरे यांनी म्हटले आहे. तर ‘सदर शाळा गावात जिथं सोईस्कर जागा असेल तिथं भरवायला मुख्याध्यापकाला सांगितले आहे. झाडाखाली शाळा का भरवली विचारणा करतो, या शाळेचा बांधकाम जिल्हा निधीतून होतो. आणि सध्या जिल्हा निधीत फंड उपलब्ध नाही. त्यामुळे येथील जीर्ण वर्ग खोली पाडून बांधकाम केल्याशिवाय सध्या पर्याय नाही’, असे गोरेगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नीलकंठ शिरसाटे यांनी म्हटले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.