यंदाही ‘त्या’ शाळेचे विद्यार्थी गिरवणार जीर्ण इमारतीतून धडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : देशात सध्या डिजिटल इंडिया आणि ई-लर्निंगच्या वल्गना केल्या जात आहेत. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना या वषीर्ही जीव मुठीत घेऊनच शिक्षण घ्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत शेकडो शाळांची दुरवस्था झाली असून शाळांच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, जंगलव्याप्त, नक्षल प्रभावित व ग्रामीण भागातील विद्यार्थी जीर्ण आणि पडझड झालेल्या शाळांच्या इमारतीमध्ये शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचाव्यात, म्हणून सन १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली; मात्र दोन दशक उलटूनही जिल्ह्यात शिक्षण आणि शिक्षण विभागाचा बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषदअंतर्गत १०६४ शाळा आहेत; मात्र जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या तब्बल ३४१ वर्ग खोल्यांची सध्या दयनीय अवस्था झाल्याचे पहावयास मिळते. त्या धोकादायक बनल्या आहेत. अवघ्या काही दिवसांवर जिल्ह्यातील शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार असून पुन्हा एकदा शाळा सुरू होतील; मात्र शेकडोशाळांची दुरुस्ती जिल्हा परिषदेने न केल्याने याच धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार आहे. सडक अजुर्नी तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीचे छप्पर, भिंती जीर्ण झाल्या गळती लागते. शाळा इमारत बाहेरून सुशोभित करण्यात आली आहे परंतु आत मधून वर्ग खोल्या खिळखिळ्या झाल्या आहेत. त्या कधी कोसळणार याचा नेम नाही. मात्र इमारतीच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत

दुरुस्ती काम नक्की कोणासाठी?

जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत दरवर्षी शाळांची रंगरंगोटी, संरक्षण भिंती बांधणे अशा कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र ज्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या धोकादायक स्वरूपात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च हा नेमका विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे की कंत्राटदारांच्या फायद्यासाठी, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

तालुकानिहाय जीर्ण शाळा

गोंदिया तालुक्यात ६५ शाळा, अर्जुनी मोर ४९, तिरोडा ४९, गोरेगाव ४७, सालेकसा ४०, देवरी ३६, आमगाव २८ व सडक अजुर्नी तालुक्यातील २७ शाळांची दुरावस्था झाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.