भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गणेशपूर ग्रामपंचायतच्या हद्दीत जुना नागपूर नाका परिसरातील रहदरीचा मुख्य रस्ता गोसे प्रकल्पात संपादीत करण्यात आला. याशिवाय रस्त्यालगतची भोजापूर हद्दीत येणारी घरे संपादीत केली. मात्र या कॉलोनीतील ती पंधरा घरे संपादीत का केली नाही? वसाहतीला जोडणारा रस्ता पुरात बुडतो, मग कॉलोनीतील घरे सुरक्षित कशी? असा सवाल पुरपिडीत नागरिकांनी उपस्थित केला आहे. जुना नागपूर नाका परिसर गट क्रं. २४६/१ मधील ०.५१ आर क्षेत्र खोलगट भागात आहे. त्यामुळे गोसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने जुना रेल्वे लाईन पुलाजवळच्या नाल्यातून वारंवार नदीचे पुर येते. त्यामुळे हा संपूर्ण क्षेत्र पुरबाधित घोषित करून नागपूर नाका कॉलोनीला जोडणारा ०.१६ आर . क्षेत्रातील मुख्य रस्ता गोसे विभागाने संपादित केला आहे. त्यामुळे मुख्य रस्ताबरोबर ०.३५ आर. क्षेत्रात वसलेली १५ घरे गोसेने संपादित करून ऐच्छिक पुनर्वसन करणे आवश्यक होते.
मात्र एकाच भूखंडमधील मुख्य रस्ता संपादित करून घरे का सोडली?, रस्ताधोकादायक आहे, मग कॉलोनीतील घरांना महापुराचा धोका नाही काय? रस्ताच नसले तर लोकांनी घरी जाणे -येणे कसे करावे? वसाहतीच्या आजूबाजूचा सर्व परिसर पुराच्या पाण्याने वेढला जातो. मग ही कॉलोनी पुरापासून सुरक्षित कशी? मुख्य रस्ताच पुरात बुडल्याने राहादरीचा मार्ग बंद होतो. त्या पंधरा कुटुंबाला घरी जाण्यासाठी दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. कॉलोनीत पुर आल्यानंतर पूर्ण वसाहत पाण्यात बुडते. नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नाही. मागील २०२० मध्ये आलेल्या महापुरात कॉलोनीतील प्रत्येक घरात १० फुटाच्या वर पाणी होते. नदीच्या पातळीत थोडीही वाढ झाली तरी या कॉलोनीत अगोदर पुराचे पाणी येत असल्यामुळे ही कॉलोनी पुरापासून सुरक्षित नाही. त्यामुळे त्या पंधरा कुटुंबाचे ऐच्छिक पुनर्वसन करणे गरजेचे आहे.