भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धुसाळा ते पांढराबोडी हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला होता. त्या कारणाने बस फे-या बंद झाल्या होत्या. परंतु आता दहा दिवस होऊन रस्त्याचे दुरुस्तीकरण झाले असताना अद्यापही बसफे-या सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थी, नागरिकांना होणारी अडचण पाहता तत्काळ धुसाळा, पांढराबोडी मार्गावर एसटीची बसफेरी सुरू करावी अशी मागणी होत आहे. नुकतेच सर्व शाळा व महाविद्यालय सुरू झाले आहेत. धुसाळा ते पांढराबोडी या रस्त्याने जवळपास १३० विद्यार्थी बसने प्रवास करतात. मात्र सध्या या मार्गावरील बसफेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना सायकल व पायदळ शाळा गाठावी लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कमालिका त्रास सहन करावा लागतो. तसेच सामान्य नागरिकांना सुध्दा जिल्हास्थळी कोणतेही शासकीय कामे किंवा दवाखान्यात जायचे झाल्यास कमीत कमी १५ किलोमीटर फे-याने जाऊन आपले कामे करावे लागतात. बस फे-यांच्या अभावात सामान्य नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन बसफेरी दोन दिवसात सुरू व्हावी याकरिता भंडारा व तुमसर आगार व्यवस्थापकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी जनसेवा संघटनेचे संस्थापक राजू पुडके यांनी केली आहे.