भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पाच वर्षांपासून गाव सोडून मावशीकडे राहणº्या मुलाने वडिलांच्या भेटीकरिता जन्मगाव गाठले. मात्र तेथे वडील न मिळाल्याने नैराश्येतून मुलाने आत्महत्या केल्याची घटना जन्माष्टमीच्या दिवशी तुमसर येथे उघडकीस आली. या घटनेतील अज्ञात मृतकाची अखेर ओळख पटली असून गोपाल पुरण उईके (३२) रा. हनुमान वॉर्ड गंगाझरी जि. गोंदिया असे त्याचे नाव आहे. तो मूळचा तुमसर शहरातील टिळक वार्ड येथील रहिवासी होता. शिवनी-कोष्टी मार्गावरील बोडीत गोपालची चप्पल व जवळच एक रेल्वेचे तिकीट आणि २० रुपयांची नोट आढळून आली होती. त्या तिकिटावरूनच तुमसर पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यात यश मिळविले.
गोपाल हा मागील पाच वर्षार्पासून गंगाझरी येथे मावशीकडे वास्तव्याला होता. मनोरुग्ण असल्याने त्याचे संगोपन मावशीच करत होती. दरम्यान २३ आॅगस्ट रोजी गोपालने गंगाझरी रेल्वे स्थानक गाठून तुमसररोडपर्यंत प्रवास केला. शुक्रवारी रात्री ८ वाजेला देव्हाडी येथे पोहोचून टिळक नगर तुमसर येथील आपल्या वडिलोपार्जित घर गाठले. मात्र येथे त्याचे वडील न मिळाल्याच्या नैराश्यातून शुक्रवारी मध्यरात्री आत्महत्या केली असावी असा अंदाज तुमसर पोलिसांनी वर्तविला आहे. मृतकाची ओळख पटल्यानंतर मंगळवारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.