ग्रामपंचायत सदस्यच बसले उपोषणावर

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुक्याची कुबेर नगरी व राजकारणाचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायत सिहोरा येथे गाळे व इमारत बांधकामात अनियमितता व लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. या प्रकरणात माजी सरपंच व तत्कालीन सचिव यांचेवर कारवाई करण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत समोर आंदोलन उभारण्यात येईल असा खरमरीत इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला माजी ग्रामपंचायत सदस्य सुशील कुंभारे, भाऊराव राऊत व गावातीलच मुकेश शुक्ला यांनी १० सप्टेंबर रोजी दिला होता. ग्रामपंचायत सिहोरा अंतर्गत ग्रामपंचायत इमारत तसेच बसस्थानक व बाजार चौकात झालेल्या गाळे बांधकामात शासनाची दिशाभूल करून भ्रष्टाचार झाला आहे. चार महिन्याचा कालावधी लोटूनही दोषिवर कारवाई करण्यात आली नाही म्हणून चौकशी अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात यावी, २५ % रक्कम ग्रामपंचायत निधीतुन भरण्यात यावी, पुरवठादार व मजुर पगार देण्यात यावे व गाळे वाटप करतांना स्थानिक लोकांनाच देण्यात यावे या मागणीसाठी काल १९ सप्टेंबर रोजी दु. १२ वा. सुशील कुंभारे, भाऊराव राऊत व मुकेश शुक्ला हे ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषणावर बसले होते.

यात जिल्हा प्रशासनाने दखल घेत समेट घडवून आणला व आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. यात उपोषण करते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे, गटविकास अधिकारी टी.आर. बोरकरर भंडारा, कार्यरत सचिव ग्रामपंचायत सिहोरा, उपसरपंच सलाम भाई शेख, सदस्य कादरभाई अन्सारी, सदस्य महेश कामथे व पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार नितीन मदनकर हे उपस्थित होते. चर्चेअंती असे ठरले की, तत्कालीन सचिव, साहित्य पुरवठादार व मजूर पक्ष आणि उपोषण करते यांनी २४ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय सिहोरा येथे चर्चेसाठी उपस्थित रहावे. यात पंचायत समिती तुमसरचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत जमा व खर्चाची पडताळणी करून त्याचा हिशोब ग्राम पंचायतच्या मासिक सभेत ठेवण्यात यावे व ग्रामपंचायत सिहोराने उचित निर्णय घ्यावे असे ठरल्यामुळे उपोषणकर्त्यांना नींबू पाणी पाजून चार तासाचे आतच उपोषणकर्त्यांना आपले उपोषण गुंडाळावे लागले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *