धावत्या रेल्वेतून पडून एका वर्षात ५२ प्रवाशांचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर: रेल्वेने प्रवास करताना सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने गेल्या वर्षभरात धावत्या रेल्वेगाडीतून पडून ५२ आणि रेल्वे रुळ ओलांडताना ५३ जणांनी जीव गमावला. रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. त्यामुळे रेल्वेतून प्रवासाला प्राधान्य दिले जाते. पण, अनेकदा सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होते. रेल्वे प्रवास करताना धावत्या गाडीतून पडून राज्यात गेल्या वर्षभरात (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२) ५२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर रुळ ओलांडताना वर्षभरात ५३ जण ठार झाले, असा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना प्राप्त झाला आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ कालावधीत वेगवेगळ्या रेल्वेगाडीतून पडून आणि रेल्वे रुळ ओलंडताना १०५ जणांचा मृत्यू झाला. तसेच चालू वर्षात (१ जानेवारी २०२३ ते मार्च अखेर) रेल्वेगाडीतून पडून १५ प्रवाशांचा तर रुळ ओलांडताना १२ जणांचा बळी गेला.

प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याप्रमाणात रेल्वेगाड्यांची संख्या वाढत नाही. दुसरीकडे केंद्र सरकार शयनयान (स्लीपर क्लास) डब्यांना महत्व देत नाही. त्याऐवजी वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. सर्वसाधारण आणि स्लीपर क्लासमधून गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवास करतात. परंतु, स्लीपरच्या तीनपट भाडे वातानुकूलित डब्यांचे असते. त्यामुळे सर्वसाधारण आणि शयनयान डबे कायमच भरलेले असतात. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना किंवा दंड आकारलेल्यांना शयनयान डब्यातून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. परिणामी, आरक्षित तिकीट असलेल्यांच्या शयनयान डब्यात देखील मोठी गर्दी होते. प्रत्येक गाडीला एक किंवा दोन सर्वसाधारण डबे असतात. या डब्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जीवघेण्या गर्दीमुळे धावत्या गाडीतून पडण्याचे प्रकार देखील घडले आहेत, असे भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.