आता शाळा-महाविद्यालयातच मिळणार मुलींना मोफत एसटी बसच्या प्रवासी पास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२ वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांचा शाळेमधील मुलींची यादी संबंधित आगारप्रमुखांकडे द्यावी. ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या ५० ते १०० पेक्षा अधिक असेल, त्याठिकाणी संबंधित आगाराचे अधिकारी जाऊन जागेवरच पास देतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात गुरुवारपासून (ता. १५) झाली आहे. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत येजा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे.

पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो. बारावीनंतरच्या मुलींना एक तृतीयांश रक्कम भरल्यावर शैक्षणिक सवलतीचा पास दिला जातो. पूर्वीसारखे आता प्रत्येक मुलींना पास काढण्यासाठी आगारासमोरील रांगेत उभारण्याची किंवा हेलपाटे मारण्याची गरज नाही. आगारातील अधिकारी मोठ्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांच्या मागणी अर्जावरून शाळेतच पासदेतील, अशी सोय करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ त्या मुलीचे बोनाफाईड लागणार आहे. मुलींना तीन-तीन महिन्यांचे पास दिले जातात. एकदा पास काढला की पुन्हा तीन महिन्यानंतरच पास मिळतो. त्यावेळी देखील मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे.

कागदपत्रे काय लागतील अन् तक्रार कोठे करायची…

ज्या शाळेत मुलगी शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून बोनाफाईड घेऊन एक अर्ज केल्यानंतर एसटी महामंडळाकडून (संबंधित आगारातून) १०० टक्के मोफत प्रवासाचा पास दिला जातो. हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था असून कोणी अधिकारी टाळाटाळ करीत असल्यास थेट आगार प्रमुखाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळ भंडारा विभाग यांनी केले आहे.

कशी मिळवायची सवलत…

शाळेचा मुख्याध्यापक त्यांच्या एखाद्या शिक्षकाच्या माध्यमातून सर्व मुलींची यादी आगार प्रमुखांना सादर करेल. त्यांची शैक्षणिक कागदपत्रे पाहून त्या सर्वच मुलींना एसटीच्या मोफत प्रवासाचे पास दिले जातील. मुलींना किंवा त्यांच्या पालकांना एसटीच्या आगारात जाण्याची आता आवश्यकता नाही. दरम्यान, मोफत किंवा सवलतीचे पास देण्यासाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र व्यवस्था असून सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत त्याठिकाणी पास काढता येतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.