मराठा आरक्षण आदोलनाला हिसक वळण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, बीडमध्ये शिवसेना नेत्याची गाडी फोडल्यानंतर दोन बसेसना आग लावल्याची घटना घडली आहे. बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अज्ञात जमावाने पेटवली. आंदोलनकर्त्यांनी बस थांबवून बसमधील प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवले व बसला आग लावून दिली. याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिली. दोन्ही घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडल्या. त्यानंतर बीडहून या मार्गाने जाणाºया बसेस बंद करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, बस रात्रीच्या सुमारास बीड बसस्थानकातून कोल्हापूरकडे रवाना झाली होती. बस आहेर वडगाव फाटा परिसरात आल्यानंतर जमावाने बस अडवली व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर बसला आग लावली. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

मांजरसुंबा घाटात दुसºया जमावाने अहमदपूर-छत्रपती संभाजी नगर बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बस न थांबल्याने जमावाने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे बसच्या इंजिनने पेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर बसमधील प्रवासांना तातडीने बाहेर काढले गेले. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. दोन्ही बसमधील प्रवाशांनी मिळेल त्या वाहनातून बीड गाठले. माहिती मिळताच बीड ग्रामीण व नेकनूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, एसटीचे अधिकारी तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. दरम्यान, बीड येथून जाणाºया बसेस बंद करण्यात आल्या असून आरक्षण केलेल्या प्रवाशांना पैसे परत केले जातील, असे बीड आगाराने सांगितले आहे. सोलापूर महामार्ग, जालना, बीड बायपाय आदी मार्गावर जमावाने टायर जाळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टायर बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.