भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दोन महिन्यांपूर्वी तकिया वॉर्डातील चौकात व्हॉल्व बदलल्यामुळे दोन महिन्यांपासून नळाचे पाणी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. भंडारा शहराच्या पश्चिम उत्तर दिशेला वसलेल्या तकिया परिसरातील हनुमाननगर व आनंद नगरात दोन महिन्यांपासून नळाचे पाणी मिळणे बंद झाले आहे. माहितीनुसार, जवळपास दोन महिन्यांपूर्वी तर त्या वॉर्डात पाणीपुरवठा करण्यात येणाºया व्हॉल्व्ह बदलण्यात आले होते. यापूर्वी कपिलनगरात पाणी येत नव्हते. परिणामी येथील व्हॉल्व्ह बदलण्यात आले.आता कपिलनगरात पाण्याचा पुरवठा होत असून हनुमाननगर व आनंद नगरात जवळपास २०० कुटुंबीयांना नळाचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू असतानाही पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पण, उन्हाळ्यात नळाला पाणी येत नसल्यामुळे येथील नागरिकांची चांगलीच कुचंबणा होत आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.