भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : एप्रिल महिना मध्यावर असताना लाखोरी येथील नळ योजनेला ज्या दोन विंधन विहिरीद्वारे पाणी पुरविले जात होते त्याच आटल्यामुळे गावात पाण्याचा पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून ठप्प पडला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून स्थानिक ग्रामपंचायतीने याची दखल घेत येथील नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळावे यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना एप्रिल महिन्यातच भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामपंचायतद्वारे तिसरी बोअरवेल गेल्या ३-४ दिवसाआधी खोदण्यात आली पण तिलाही पाणी लागले नाही. लाखोरी गावातील पाणी पुरवठ्याचा मुख्य स्त्रोत बंद असल्याने तसेच येथील पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे व पाण्याचे जमिनीतील झरे आटल्यामुळे विंधन विहिरीला सुद्धा पाणी लागत नाही. त्यामुळे गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर हात पंपाला पाणी येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत आपल्या स्तरावर खासगी टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहे.
लाखोरी येथील लोकसंख्या ३०१७ आहे. २०१७ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे १ लाख ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली. त्या टाकीद्वारे गावतील ४२० कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे. लाखोरी येथे कुटुंबसंख्या ६८१ आहे. त्या तूलनेत पाणीपुरवठा योजना अपुरी आहे. लाखोरी गाव टेकडीवर आहे तसेच आलेसुर, लाखनीच्या दिशेने वस्ती विस्तारित झाली आहे. १५ वित्त आयोगातून नळ योजनेचे काम करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना पूर्वी कार्यान्वित होती ५० हजार लिटर क्षमतेची टाकी निकृष्ट अवस्थेत आहे. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली. पूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे १४० जोडणी होती. नळ योजनेचे पाईपलाईन खराब झाली आहे. गावात २२ विंधन विहिरी आहेत. खासगी विहिरी कोरड्या आहेत. सार्वजनिक विहिरी कालबाह्य झाल्या आहे. जवळपास ५० कुटुंबाकडे खासगी बोअरवेल आहेत.