भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : अचानक आलेल्या मुसळधार पावसासह शेतशिवारात वीज कोसळल्याने एका बालकाचा मृत्यू झाला. तर झाडाखाली बांधलेला बैल सुध्दा ठार झाल्याची घटना २२ रोजी दुपारच्या सुमारास सिहोरा लगतच्या चिचोली व सूकळी/नकूल परिसरात घडली. चिचोली शेतशिवारात सुरेंद्र बाबुलाल भोरगडे व त्यांचा मुलगा प्रांशू सुरेंद्र बोरगडे (१२) हे काम करीत होते. यावेळी शेतात वीज कोसळल्याने प्रांशू बोरगडे हा बेशुध्द झाला. त्याला तातडीने सिहोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दुसरी घटना सूकळी/नकूल गावात घडली. येथेही वीज कोसळल्याने येथील शेतकरी हंसराज रहांगडाले यांच्या गोठयातील बैलाचा मृत्यू झाला. यामुळे शेतक-याचे जवळपास ३५ हजाराचे नुकसान झाले. शासनातर्फे नुकसानग्रस्त शेतक-याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी डॉ.जितेंद्र तुरकर यांनी केली आहे.