भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : अर्धवट बांधकाम असलेल्या रस्त्यावर कंत्राटदाराने योग्य उपाययोजना न केल्याने व नगर परिषदेनेही दुर्लक्ष केल्याने प्रचंड धूळीचे लोळ उडत असल्याने नाहक मन:स्ताप सहन करण्याची वेळ साकोली येथील एम.बी. पटेल मार्गावरील नागरिकांवर आली आहे. गेलेला राष्ट्रीय महामार्ग ते एम.बी. पटेल कॉलेज रोड व पुढे गडकुंभली पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असले तरी राष्ट्रीय महामार्ग ते जिल्हा परिषद हायस्कूल पर्यंतचा रस्ता व नालीचे बांधकाम साकोली नगर परिषदेच्या अखत्यारित आहे. नगर परिषदेच्या कंत्राटदाराने गेल्या आठ दिवसापासून रस्त्याचे खोदकाम करून त्यावर मुरूम टाकून ठेवले. हा सतत वर्दळीचा रस्ता असल्याने आता या मुरूमाची माती झाली असून प्रचंड धूळ उडते. त्यामुळे या रस्त्यावरील रहि- वासी व दुकानदारांचे जगणे कठीण झाले आहे.
खोदकाम केलेला रस्ता व त्यावर उडणारी धूळ यातून एखादे मोठे वाहन गेल्यास पुन्हा धुळीचे प्रचंड लोळ उडतात. रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरावर आणि घराच्या आतमध्येही धूळच धूळ दिसते. दुकानांमधील साहित्य आणि विविध जिन्नस देखील धुळीमुळे खराब होत आहे. धुळीचा त्रास पाहता नागरिकांनी नगर परिषदेकडे टँकरने पाणी मारण्याची विनंती केली होती. मात्र नगर परिषद व कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केले. मागील चार दिवसापासून रस्त्याचे काम पुर्णत: बंद आहे. ३ त्यामुळे या रस्त्याकडे कुणी ढूंकूनही पाहिले नसून नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. साकोली नगर परिषदेने याकडे लक्ष न दिल्यास नगर परिषदेवर मोर्चा नेण्याचा मानस येथील नागरिकांकडून बोलून दाखविला जात आहे.