भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- संगणकाचे प्रशिक्षण आटोपुन गावाकडे परत येणाºया एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा एका ३५ वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना आज दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.याप्रकरणी लाखनी पोलीसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून शिक्षणाचे माहेरघर आहे. शहरातील खाजगी व शासकीय संस्थांमार्फत विविध प्रकारचे शिक्षण व प्रशिक्षण लाखनी शहरात उपलब्ध आहेत. त्यामुळे तालुक्यातील व आसपासच्या गावातील विद्यार्थी विविध शिक्षण व प्रशिक्षणासाठी लाखनी येथे येत असतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने एक १७ वर्षीय पीडित विद्यार्थिनीने लाखनी येथे एका खाजगी संगणकाकडे संगणक प्रशिक्षणाचे वर्ग लावले व ती त्यासाठी नियमितपणे येत होती. संगणक प्रशिक्षणाचे वर्ग संपल्यानंतर ती आपल्या मैत्रिणी सोबत गावी जात होती.
आज दि.२२ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे पिडीत विद्यार्थिनी संगणक प्रशिक्षण वर्ग संपल्यानंतर एका खाजगी संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मैत्रिणीकडे गेली असता आरोपीने तिचा पाठलाग करत तिला गाठले व पीडितेच्या मनाला लज्जा येईल असे कृत्य केले. आरोपी एवढयावरच न थांबता तुला जे करायचे ते कर अशी धमकी दिल्याने पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी ३५ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक चीलांगे करीत आहेत.