भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : येथील सिंधी लाईन चौकातून पायदळ एकटे रस्त्याने जात असताना दुचाकीने मागून येऊन पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या जवळील एक लाख सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे गोफ व सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना बुधवारी (ता.२४) सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली. चरणदास जीवन हटवार वय ६३ वर्ष रा. शिवनी बांध (ता. साकोली) असे वृद्धाचे नाव आहे. चरणदास हटवार आहे बुधवारी सकाळी सात तीस वाजताच्या दरम्यान नागपूर येथून निघून नऊ तीस वाजताच्या दरम्यान बसने लाखनी येथे पोहोचले. येथील बाजार ओळीतील सिंधी लाईन चौकात उतरून सावरी येथील नातेवाईक केवळराम मेहर यांच्या घरी जाण्यासाठी सिंधी लाईन चौकातून पायदळ निघाले.
दरम्यान सिंधी लाईन चौकातील भोले शंकर मॉल समोर पोहोचल्यावर मागे होऊन दोन ४०ते ४५ वयोगटातील दोन इसम दुचाकीने आले त्यांनी आपली दुचाकी पत्रकार भवनजवळ ठेवली व वृद्धाला आवाज देऊन जवळ बोलावले व तुम्ही कुठे जात आहात अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी सावळी कडे जात असल्याचे सांगितले त्यानंतर तुम्ही तिकडे जाऊ नका सावरी कडे मर्डर झालेला आहे आम्ही पोलीस वाले आहोत व तुमच्याजवळ असलेले दागिने काढून आपल्या खिशात बांधून घेऊन जा असे म्हणाले तेव्हा त्या वृद्धाने स्वत:च्याच गळ्यातील १५ ग्राम सोन्याची चैन व ५ ग्राम सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख सहा हजार रुपयाची सोन्याचे दागिने काढून दिले व आपल्याच खिशातील रुमाल काढून रुमालात ठेवायला दिले. त्यांनी रुमाल मध्ये बांधलेले दागिने वृद्धाला खिशात ठेवायला दिले. वृद्धाने नातेवाईकाच्या घरी जाऊन तिच्यातील रुमाल तपासली असता रुमालात ठेवलेले दागिने आढळून आले नाही लगेच त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने शोधाशोध केली परंतु ते भामटे दिसून आले नाही अखेर गुरुवारी त्यांनी पोलीस स्टेशन गाठत घटनेची माहिती दिली पोलिसांनी वृद्धाच्या तक्रारीवरून त्या तोतया पोलिसांवर गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.