भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या हद्दीतील ४७ कोटींची पाणीपुरवठा योजने अंतर्गत पक्के सिमेंटचे रस्ते फोडून नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे कामे संथगतीने सुरू आहे. मात्र, धुळीने जनता त्रस्त झाली असून या कामकाजामध्ये नियोजनाचा अभाव असल्याने याचा फटका शहरातील नागरिक तसेच वाहनधारकांना सोसावा लागत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला योग्य सूचना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. २०१७ मध्ये ४७ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन कामाला सुरुवात करण्यात आली होती. कवलेवाडा येथील धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तीन वर्षातही योजना पूर्णत्वास येणार होती, तसा करारही करण्यात आला होता. परंतु सातवर्षे लोटली तरीही तुमसर शहरवासीयांना नवीन पाणीपुरवठा योजनेतून फायदा अद्यापही झाला नाही. या योजने अंतर्गत तुमसर शहरातील विविध ठिकाणी जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे त्यामुळे गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते फोडण्यात येत असून संपूर्ण रस्ते अरुंद होऊन रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे त्याचा फटका नागरिकांना सोसावे लागत आहे.
सदर पाणीपुरवठा योजनेचे कामे नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. ४७ कोटी खर्च करून सुमारे ८० किलोमीटरची जलवाहिन्या जाळे टाकण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी शहरातील नगरपरिषद ते पोलीस स्टेशन पर्यंत जेसीबीद्वारे मुख्य रस्त्यावर खोदून नव्याने प्लास्टिक पाईप टाकण्याचे काम सुरू होते. प्रीतपाल सिंग अँड कंपनी नागपूर यांच्याकडे या कामाचा कंत्राट असल्याची माहिती नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिका?्यांनी सांगितले. सध्या जेसीबीच्या सहाय्याने खुदाईचे काम करून नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येत आहे. मात्र हे काम करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला सूचना फलक लावणे गरजेचे आहे, मात्र सदर रस्त्यावर खोदकाम सुरू असल्याने वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या भागातील व्यावसायिकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.