भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : उन्हाळ्याच्या सुट्टया, लग्नसराई यामुळे रेल्वेचे तिकीट बुकींग मागील महिन्यापासून जवळपास फुल्ल आहे. अशात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेत व सोयीसाठी दोन उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांचा गोंदियापर्यंत विस्तार केला आहे. गोंदिया-छपरा व छपरा गोंदिया या दोन रेल्वेगाड्या आहेत. गोंदिया रेल्वेस्थानकावरुन मुंबई, पुणे, रायपूर, जबलपूर, चंद्रपूर आदी मार्गावर प्रवासी गाड्या सुटतात. तसेच हावडामुबंई रेल्वेमार्गावर धावणाºया जवळपास सर्वच गाड्या थांबतात. त्यामुळे स्थानकावरुन दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात.
यात जिल्ह्यासह शेजारील मध्यप्रदेशातील प्रवाशांचाही समावेश राहतो. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने वेळेवर प्रवासाचे नियोजन करणाºयांची मोठी गैरसोय होते. प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी रेल्वे विभागातर्फे दरवर्षी उन्हाळ्यात विशेष उन्हाळी रेल्वेगाड्या सोडल्या जातात. यातंर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नुकतीच दोन उन्हाळी गाड्यांचा गोंदियापर्यंत विस्तार केला आहे. दुर्ग-छपरा-दुर्ग व दुर्गपाटणा-दुर्ग दरम्यान धावणाºया उन्हाळी विशेष गाड्या गोंदियापर्यंत धावणार आहे. या गाड्या मे महिन्यात दर सोमवारी गोंदिया येथून छपरा येथे व दर मंगळवारी छपरावरुन गोंदियाकडे धावणार आहे. याचा जिल्ह्यातील प्रवाशांसह डोंगरगड, राजनांदगाव व दुर्ग येथील प्रवाशांना लाभ होणार आहे.