भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींसह सर्वच सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे यांच्या मनमर्जी कारभाराला कंटाळून नाराजी व्यक्त करीत ३० एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित मासिक बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच कामकाजात सुधारणा न झाल्यास सर्वच मासिक सभांवर बहिष्कार कायम राहण्याचा इशारा दिला. सभापतींच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधताना वरिष्ठ अधिकाºयांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची तसेच चौकशी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. बहिष्कार आंदोलनात सभापती रत्नमाला चेटुले, उपसभापती प्रशांत खोब्रागडे, सदस्य पंकज लांबट, विलास लिचडे, किशोर ठवकर, स्वाती मेश्राम, गीता कागदे, कांचन वरठे, भागवत हरडे, राजेश वंजारी, किर्ती गणवीर, वर्षा वैरागडे, संजय बोंदरे, कल्पना कुर्झेकर, रिषिता मेश्राम, नागेश भगत, प्रभाकर बोदेले, काजळ चवळे, सीमा रामटेके, भाग्यश्री कांबळे यांचा समावेश आहे. भंडारा पंचायत समितीत १४५ गावे व ९४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या ६ आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळा कार्यरत आहेत. पंचायत समितीमार्फत पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, रोजगार हमी, घरकूल आदी व अन्य कामे संचालित होतात. परंतु, भंडारा पंचायत समिती व गाव पातळीवर काम करणाऱ्या अधिकाºयांवर गटविकास अधिकाºयांचा वचक नाही. अधिकारी व कर्मचारी केव्हाही कार्यालयात येतात आणि जातात. सर्वसामान्य नागरिकांना आल्यापावली परतावे लागते. पंचायत समिती सदस्य, सभापती व उपसभापतींकडे नागरिकांच्या या संबंधी वारंवार नागरिक तक्रारी करीत असतात. गटविकास अधिकाºयांच्या कानावर नागरिकांच्या तक्रारी ठेवूनही अधिकारी व कर्मचाºयांच्या बेलगाम वर्तणुकीवर नियंत्रण येताना दिसत नाही. उलट अधिकारी व कर्मचाºयांना पाठबळ देतात. गाव पातळीवर होणाºया शासकीय कार्यक्रमांचे निमंत्रण पंचायत समिती सदस्यांना संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांकडून दिले जात नाही.