भंडारा पत्रिका/वार्ताहर खमारी : ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या घडवून आपल्या संसाराचा गाडा चालविणाºया विदर्भातील ३० लक्ष कुंभार बांधव तंत्रज्ञानाच्या युगात मागास राहण्याचा अभिशाप भोगत आहेत. राज्य शासनाने स्थापन केलेल्या मातीकला बोडार्ला पाच वर्षात एक रुपया दिला नाही. परिणामी त्यांच्या योजनाच कार्यान्वित न झाल्याने या समाजबांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे. कुंभार समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक. अलीकडे संत गोरा कुंभार यांची परंपरा ते सांगतात. तथापि, वंशपरंपरागत असलेल्या त्यांच्या कुंभारकलेला आधुनिक तंत्रज्ञान व चिनी वस्तूंमुळे उतरती कळा आली आहे. त्यामुळे आजघडीला त्यांच्या कौटुंबिक उदरनिवार्हाचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आला आहे.
विदर्भात भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला या जिल्ह्यात कुंभार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी थाटलेला वंशपरापंरागत व्यवसाय गावोगावी पाहावयास मिळतो.मात्र, त्यांनी मातीपासून तयार केलेल्या भांड्यांना कोणत्याच जिल्ह्यात स्थायी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे गावखेड्यात भटकंती करून ही मातीची भांडी विकावी लागत आहेत. वाढत्या महागाई व दुष्काळात कसे तग धरून राहायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याची व्यथा कुंभार समाजबांधवांनी मांडली.