भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जागतिक तापमान वाढीचे परिणामस्वरूप यंदाचे उन्हाळ्यातील तापमान नेहमीच्या सरासरी तापमानापेक्षा किमान १-२ अंश से. ने जास्त आहे. मानवास ज्याप्रमाणे वाढत्या तापमानास तोंड द्यावे लागते तीच परिस्थिती पशुधनाची ही असते. त्यामुळे पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. वातावरणातील तापमान वाढीचे परिणाम पशुधनाच्या शरीरक्रियेवर होऊन पशुधन आजारी पडू शकते किंवा दगावण्याची शक्यता ही असते त्यास उष्माघात किंवा उष्णलहरी म्हणले जाते. एखाद्या भुभागात / भौगोलिक क्षेत्रात उष्णलहरीं असताना वातावरणातील तापमान त्याकाळातील नियमित सरासरी तापमानापेक्षा किमान ३ अंश से. किवा जास्त तापमान सलग ३ दिवसांसाठी किंवा जास्त कालावधी साठी असू शकते. अशा ठिकाणी ४५ अंश से. किंवा जास्त तपामान सलग २ दोन दिवसांसाठी असू शकते. यामुळे पशुधनांच्या शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होते. तसेच चारा व खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून उत्पादन कमी होते. उष्ण लहरींपासून बचाव व उष्ण तापमानास जुळवुन घेण्यासाठी पशुधनास सवयीचे करणे,प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रथमोपचार व पशुवैद्यकीय उपाय याबाबींद्वारे उष्णलहरी पासून होणा-या आजारांपासून पशुधनांचा बचाव करता येतो.
तुलनेने थंड तापमानातून पशुधनास थेट उष्ण तापमानात नेण्याचे टाळावे. पशुधनास फक्त दिवसाच्या थंड वेळी चरावयास सोडावे व उष्ण कालावधीत सावलीत अथवा हवेशीर निवा-यात ठेवावे. पशुधनास वाढत्या तापमानाची हळू हळू सवय लावावी. लहान वासरे/करडे, काळया अथवा गडद रंगाचे प्राणी, श्वासाच्या आजाराने ग्रस्त अथवा आजारी पशुधन, वराह, नुकतेच लोकर कापलेल्या मेंढ्या, दुभते पशुधन, मोठ्याचणीची जनावरे अशा पशुधनास व कुक्कुट पक्ष्यांना उष्माघाताचा जास्त धोका असतो. उष्माघात किंवा उष्णलहरींच्या प्रकोपाचा प्रभाव झालेले पशुधन ओळखने अत्यंत महत्वाचे असते. अशा पशुधनात धाप लागणे, श्वासाचा दर वाढणे, पाणी जास्त प्रमाणात पिणे, चारा पाणी घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट,पशुधन सुस्तावते, लाळ गाळते, नाकपुड्या कोरड्या पडतात, पशुधनाच्या शरीरातील पाणी व क्षार (डिहायड्रेशन) यांचे प्रमाण कमी होने ही लक्षणे आहेत.