भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नागपूर येथील सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. करण ऊर्फ रोहन दिलीप गाडगीलवार (२३, रा. पार्वतीनगर, रामेश्वरी) असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने जिल्ह्यात पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या घटनेचा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांना ६ मे रोजी गोपनीय बातमीदार व गुन्हेगारांच्या तांत्रिक माहितीच्या विश्लेषणावरून माहिती मिळाली की, तिरोडा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरी, घरफोडी गुन्ह्यातील गुन्हेगार हे नागपूर येथील रहिवासी असून त्यांनी गोंदिया जिल्ह्यात बरेच घरफोडीचे गुन्हे केले आहेत.
या माहितीच्या आधारे पथकाने नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांचे मदतीने सराईत गुन्हेगार करण ऊर्फ रोहन दिलीप गाडगीलवार व त्याचा साथीदार विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी आदर्श रमेश समर्थ (२०, रा. पार्वतीनगर, रामेश्वरी) याच्यासह गोंदिया जिल्ह्यात तिरोडा पोलिस ठाण्यातंर्गत ३, आमगाव व सालेकसा पोलिस ठाण्यातंर्गत प्रतयेकी एक असे ५ घरफोडी केल्याची कबुली दिली. यातील आदर्श समर्थ हा फरार आहे. विधीसंषर्घ बालकाला सूचनापत्र देऊन त्याच्या नातेवाईकाच्या सुपूर्द करण्यात आले. तर करण उर्फ रोहन गाडगीलवार याला तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई, आरोपीस अटक, गुन्ह्यातील मुद्येमाल जप्तीची प्रक्रिया तिरोडा पोलिसांद्वारे करण्यात येत आहे