अनाधिकृत डंम्पिंगमधून रेतीची सर्रास विक्री

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : वैनगंगा व बावणथडी नदीच्या काठावर आणि सोंड्या गावात रेतीचे डेपो मंजूर करण्यात आले आहेत. रेतीचे विशालकाय ढीगारे आहेत. सक्करधरा गावांचे शिवारात अनधिकृत डंम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहेत. डेपो मधील रेतीची विक्री करण्यात येत नसतांना अनधिकृत डंम्पिंगमधून रात्रीचे वेळी रेतीची विक्री करण्यात येत आहे. अनधिकृत डंम्पिंगला अभय कुणाचे? असा प्रश्न उभा ठाकला आहे. रेतीचे डेपो असल्यामुळे आम्ही रस्त्यावरून चालायचे कसे? असा संतप्त सवाल नागरिक करित आहेत. नदीचे पात्र माफियांनी पोखरले आहे व पोखरने सुरूच आहे. सोंड्या गावात रेती डेपो मंजूर झाल्यानंतर २ किमी अंतरावरील सक्करधरा गावांचे शिवारात नवीन अनधिकृत डंम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. या यार्डमध्ये दिवसालाच ट्रॅक्टरने नदी पात्रातून रेतीचा उपसा करण्यात येत आहे. रात्री ट्रकच्या माध्यमातून रेतीची वाहतूक शहरात करण्यात येत आहे. दिवस असताना राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या रांगा दिसत नाहीत. मात्र सायंकाळ होताच सिहोरा परिसरात ट्रकच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. अनधिकृत डंम्पिंगला अभय कुणाचे? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. सक्करधरा गावांचे शिवारातून ट्रॅक्टरने नदी पात्रातून राजरोसपणे उपसा करण्यात येत असल्याने गावकरी संतापले आहेत. ५० हुन अधिक ट्रॅक्टर दिवसभर गावातून धावत आहेत. ही रेतीची डंम्पिंग करणारे गावातील राजकिय कार्यकर्ते आणि रेती माफिया असल्याची माहिती मिळाली आहे.

शासकीय रेतीचे डेपो मंजूर असताना अन्य रेती घाटातून उपसा बंद करण्यात आले नाही. अनधिकृत रेतीचे डंम्पिंग प्रशासकीय यंत्रणेच्या निदर्शनास येत नसल्याने अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. अनधिकृत रेती डंम्पिंगला कुणाचे पाठबळ आहे. हे न समजणारे कोडेच आहे. यात आलबेल प्रकार असल्याचे समजते. क्षमतेपेक्षा अधिक टन रेतीची वाहतूक करणारे ट्रक रात्रीला भरधाव वेगाने ग्रामीण रस्त्यावरून धावत आहेत. यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महालगाव ते नाकडोंगरी मार्गावरून पायदळ चालणे अडचणीचे झाले आहे. मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत गावातील नागरिकांना सोईचे ठरण्यासाठी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहेत. परंतु सक्करधºयाचे अनधिकृत डंम्पिंगमधून रात्री रेतीची विक्री होत असल्याने रस्ते खड्ड्यात गेले आहेत. महालगावचे सरपंच पारस भुसारी यांनी रेती माफियांचे विरोधात थेट बंड पुकारले आहे. रेतीचे ट्रक मुख्य मार्गाने धावण्या ऐवजी ग्रामीण मार्गाने धावत आहेत. हे रस्ते देखभाल आणि दुरुस्तीसाठी करारबद्ध आहेत. परंतु गुळगुळीत रस्ते आता जिकरीचे झाले आहेत. रेती माफियांना सरपंचांनी थेट आव्हान दिले आहेत. ग्रामीण रस्त्याने ट्रकची वाहतूक केल्यास मार्गच बंद करण्यात येणार असल्याचे ठणकावून सांगण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *