तरुणाजवळून पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : विदेशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिन व पाच जिवंत काडतुसे विकण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाकडून पोलिसांनी ते पिस्तूल, मॅगझिन व काडतुसे जप्त केली. शहरातील श्रीनगर परिसरातील चंद्रशेखर वॉर्डात शुक्रवारी (दि.१०) स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. विक्रांत ऊर्फ मोनू गौतम बोरकर या (२८, रा. श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर लगाम लावण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे कारवाई करून विविध कायद्यान्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी (दि.१०) अवैध शस्त्रे बाळगणाºयांचा शोध घेत असताना त्यांना विक्रांत बोरकर याच्याकडे पिस्तूल असल्याची व तो त्याची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्या बातमीची सत्यता पडताळून पथकाने वरिष्ठांना कळविले व विक्रांत बोरकर याच्या घरी धडक दिली.

तसेच, त्याच्या घरातून विदेशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिन आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी विक्रांत बोरकर विरुद्ध शहर पोलिसांत भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला जप्त पिस्तुलासह शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, तुलसी लुटे, नेवालाल भेलावे, इंद्रजित विसेन, रियाज शेख, शिपाई संतोष केदार यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *