भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्य.) अधीक्षक श्रीमती प्रभा दुपारे यांनी केलेल्या गैरवर्तणूकीच्या अनुषंगाने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी आयुक्त (शिक्षण) यांच्याकडे केली आहे. भंडारा येथील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) कार्यालयात अधीक्षक म्हणून श्रीमती प्रभा दुपारे जुलै २०२३ पासून कार्यरत असून त्यांनी प्रशासकीय कामात गैरवर्तणूक केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. यात कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण नसणे व प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष करणे, जिल्हा कोषागार कार्यालयास चुकीची देयके सादर करणे, विना परवानगीने गैरहजर राहणे. वरिष्ठांच्या पत्रांना उत्तर न देणे व अवहेलना करणे, पुरवणी/ थकीत देयकांवर व वैद्यकीय देयकांवर कार्यवाही न करणे, कार्यालयाची रोखवही अद्ययावत न ठेवणे आदी गंभीर बाबी चौकशीअंती निदर्शनास आल्या आहेत.
सदर बाब गंभीर स्वरूपाची असून यास कार्यालय प्रमुख म्हणून श्रीमती प्रभा दुपारे या जबाबदार आहेत. त्यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ३ चे उल्लंघन करणारी असल्याचे आयुक्त (शिक्षण) यांनी त्यांच्या चौकशी पत्रात म्हटले आहे. वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्य.) कार्यालयातील अनियमिततेबाबत अनेकदा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे भंडारा जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी शासनाकडे व आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या. त्यानंतर झालेल्या चौकशीअंती त्या दोषी आढळल्या. त्यानुसार भंडारा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) अधीक्षक श्रीमती प्रभा दुपारे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे तथा विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले यांनी आयुक्त (शिक्षण) पूणे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.