बदलत्या निसर्गचक्रामुळेच विदर्भात वादळांचे थैमान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विदर्भात कधी वादळ, कधी गारपीट, तर कधी अवकाळी पाऊस बरसतो आहे. एप्रिल आणि मे महिन्यात आतापर्यंत अनेकदा वादळाने नागपूरसह अन्य जिल्ह्यांना झोडपून काढले. विदर्भात वारंवार येणारे वादळ चिंतेची बाब असून, हा ‘ग्लोबल वॉर्मिंग’ व बदलत्या निसर्गचक्राचा परिणाम असल्याचे स्पष्ट मत, चंद्रपूरचे हवामान अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले. जोरदार वादळाने एकाच आठवड्यात दोनवेळा नागपूरकरांची दाणादाण उडविली. शिवाय अधूनमधून गारपिटीचाही तडाखा दिला. नागपूर व विदर्भात वारंवार येत असलेल्या वादळ व गारपिटीमागचेकारण प्रा. चोपणे यांच्याकडून जाणून घेतले असता, त्यांनी याला बदलते निसर्गचक्र कारणीभूत असल्याचे सांगितले.ते म्हणाले, उन्हाळ्यात वादळ, गारपीट किंवा अवकाळी पाऊस येणे आता नवीन बाब राहिली नाही. गेल्या काही वर्षांपासून हे विदर्भात सातत्याने घडत आहे. मुळात ऊन-पावसाचा विचार केल्यास, विदर्भ, मध्य भारत व आजूबाजूचा परिसर संवेदनशील भाग असून, दोन समुद्रांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे येथे एकीकडे राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे वाहतात, तर दुसरीकडे अरबी व बंगालच्या उपसागराकडील बाष्पयुक्त वारे येत असतात. दोहोंच्या संगमामुळे बºयाचवेळा ‘लोकल डेव्हलपमेंट’ होऊन विदर्भात वादळ, सोसाट्याचा वारा व गारपीट होते. यावेळी ‘एल निनो’ संक्रमणकाळातून जात असल्यामुळे नेहमीपेक्षा जरा जास्तच प्रभाव दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे, विदर्भात दरवर्षी उन्हाचे तीव्र चटके बसतात. पारा ४६-४७ अंशांपर्यंत जातो. मात्र यंदा असे काहीच घडले नाही.

दोन-चार दिवसांचा व दोन-तीन शहरांचा अपवाद वगळता कडक उन्हाळा जाणवलाच नाही. गेल्या दोन महिन्यांत केवळ एकच दिवस (५ मे) नागपूरचे तापमान ४३ अंशांवर गेले होते. तर अकोल्याचा पारा ४४.४ पर्यंत सरकला होता.आणखी काही शहरांचा अपवाद वगळता तापमान सरासरीच्या खालीच राहिले आहे. केवळ उन्हाळाच नव्हे, पावसाळा व हिवाळ्याचे स्वरूपही दिवसेंदिवस बदलत चालले आहे. कधी प्रचंड पाऊस पहायला मिळतो, तर कधी हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी पडते. समुद्रांमध्येही चक्रीवादळे मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. हे विचित्र वातावरण बदलत्या निसर्गचक्राचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे एकूणच निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगच ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या प्रभावाखाली वावरते आहे. विदर्भालाही बदलत्या ऋतुचक्राचा फटका बसतो आहे. या समस्येला मानवी चुका मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात वेळीच कठोर पावले उचलली न गेल्यास भविष्यात मनुष्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *