भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : अज्ञात भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वडीलाचा जागीच मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना सडक अजुर्नी तालुक्यातील डोंगरगाव /डेपो येथील पुलावर आज शुक्रवार १७ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. चंद्रशेखर वामन साखरे (४५) असे मृताचे, तर मासूम चंद्रशेखर साखरे (१५) दोघेही रा. कोहमारा ता. सडक अर्जुनी असे जखमी मुलाचे नाव आहे. चंद्रशेखर साखरे हे मुलगा मासूमसोबत दुचाकीने कोहमारा येथून पुतळी गावी काकाकडे जात होते.
दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास डोंगरगाव/डेपो येथील पुलावर अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात चंद्रशेखर साखरे यांच्या डोक्यावरून ट्रकचा चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा मासूम हा जखमी झाला असून त्याचा डावा हात मोडला. मृत चंद्रशेखर साखरे यांचे देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर चंद्रशेखर यांचे प्रेत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर कोहमाराजवळील स्मशानभूमीत संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून तपास सुरू आहे.