प्रतिनिधी मौदा : धान्य गहाण ठेवण्याच्या मोबदल्यात कर्जाची उचल करून सुमारे १५१ शेतकºयांची तब्बल ११३ कोटींनी फसवणूक झाल्याचे प्रकरण काही महिन्यापूर्वी घडले. याविषयी मौदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात आता ईडीने प्रवेश केला आहे. यातील फिर्यादी रामकृष्णा निंबूळकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार ईडी कार्यालयात रामकृष्णा निंबूळकर यांना सोमवार २० मे २०२४ रोजी योग्य ती माहिती देण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक असल्यास त्यात ईडीतर्फे तपास केला जातो. याच नियमानुसार तब्बल एक वर्षानंतर ईडीने शेतकºयांची ११३ कोटींनी फसवणूक झालेल्या प्रकरणात हात टाकला आहे. रमण्णाराव मुसलिया बोल्ला, वीर व्यंकटराव सत्यनारायण वाकलकुडी, महिंद्र्रा मुप्पू वारको, कॉपोर्रेशन बँकेचे व्यवस्थापक मंशुराम पाटील, संदीप जगनाडे, एनसीएमएल कंपनीचे तत्कालीन अधिकाºयांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील रमण्णाराव बोल्ला हा मुह्यय सूत्रधार आणि आरोपी आहे. यात एकूण १८ आरोपी आहे. तर मंशुराम पाटील याचा तपास सुरू असतानाच मृत्यू झाला. पारशिवनी, मौदा, रामटेक तालुक्यातील १५१ शेतकºयांची आरोपींनी फसवणूक केली आहे. बोल्ला याची मौदा येथे राईस मील आहे. शेतकºयांनाधान्य गहाण ठेवल्याच्या मोबदल्यात बँकेकडून कर्ज दिले जाते.
सन २०१७ मध्ये नागपूर जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. शेतकरी आर्थिक संकटात अडकले होते. बोल्ला याने दुष्काळग्रस्त शेतकºयांना सरकारकडून मदत मिळत असल्याचे सांगितले. त्याने साथीदारांच्या मदतीने १५१ शेतकºयांना नागपुरातील सदर शाखेतील कॉपोर्रेशन बँकेत आणले. तिथे त्यांच्याकडून आधारकार्ड आणि पॅन कार्ड घेतले. त्यांचे खाते उघडले. तिथेच अधिकाºयांशी संगनमत करून तातडीने चेकबुकही घेतले. त्या सर्व धनादेशावर शेतकºयांच्या स्वाक्षºया घेतल्या आणि ते आपल्याजवळ ठेवले. त्यानंतर आरोपी बोल्ला व त्याच्या साथीदारांनी बनावट दस्तऐवजाद्वारे धान्याच्या मोबदल्यात कर्ज मिळविण्यासाठी बँकेत अर्ज केला. त्या आधारावर शेतकºयांना तातडीने कर्ज मंजूर करण्यात आले. धनादेशाद्वारे विविध २४ खात्यांमध्ये कर्जाची रक्कम वळती करून शेतकºयांची फसवणूक करण्यात आली. पण मुळात शेतकºयांना काहीच मिळाले नाही. विशेष म्हणजे यातील बहुतांश आरोपी विविध राजकीय पक्षांशी निगडीत आहेत. यामुळे हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न झाला. पण काही समाजभान जपणाºयांमुळे हा घोटाळा उघड झाला हे विशेष.