भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजूर प्रधान (अकुशल) कामावर अपघात अथवा इतर कारणांमुळे मजुराचा मृत्यू झाल्यास मागील २० वर्षापासून त्याचे वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्यात वाढ करून ५ लक्ष रुपये करण्यात यावे. या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात नायब तहसीलदार श्यामराव शेंडे यांचे मार्फत सोमवार (ता.२०मे) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदन पाठविण्यात आले आहे. ग्रामीण परिसरातील दारिद्रय रेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध करण्याचे उदात्त हेतूने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेस सुरुवात केली. ती राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू आहे. या योजनेत ६० टक्के अकुशल (मजूर प्रधान) आणि ४० टक्के कुशल (बांधकाम) इत्यादी कामांचे प्रावधान आहे. या योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसरात असल्यामुळे नियोजन, देखरेख व सनियंत्रणाचे काम ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले आहे. ग्रामसेवकाचे मदतीला मानधन तत्त्वावर ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या योजनेच्या कामावरील मजूरास अपघात किंवा इतर कारणांमुळे मजूर मरण पावल्यास त्याचे वारसानांना महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक रोहयो-विपआ-२१००/ प्र.क्र.१६३/रोहयो-१ मंत्रालय मुंबई-३२ दिनांक २९ आॅगस्ट २००३ अन्वये ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. शासनाव्दारे इतर संचलित योजनांत नैसर्गिक आपत्तींमुळे मृत्यू झाल्यास ४ लक्ष रुपये, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ८ लक्ष रुपये तसेच शेतकरी अपघात विमा योजनेत २ लक्ष रुपयाचे प्रावधान आहे. त्या मानाने मग्रारोहयो कामावर मजुरांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारे सानुग्रह अनुदान अत्यंत तोडके असून सदर अनुदान मागील २० वर्षापासून देय आहे. वर्तमान परिस्थितीचा विचार करून सानुग्रह अनुदानात वाढ करून ५ लक्ष रुपये करणाºया यावी. या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात नायब तहसिलदार श्यामराव शेंडे यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनावर डी. वाय. बडोले, कालिदास खोब्रागडे, सोनू राऊत, मोहन बोरकर, सुरेश मेश्राम, अरविंद कठाने, प्रमोद शिंगाडे, नितीन इलमकर, चिरंजीव बारसागडे, बादशाह मेश्राम, किशोर तरजुले, भोला राऊत, नित्यानंद मेश्राम, क्रिष्णा कापगते यांचे स्वाक्षºया आहेत.