भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभागा अंतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र हनुमान नगर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस चौकात अंदाजे सात महिन्यांपासून सुरू आहे. येथे रक्तदाब, मधुमेह, पोटाचा विकार, मनोविकार, क्षयरोग टीबी, नेत्र तपासणी, कर्करोग इत्यादी आरोग्य सेवा दिली जाते. परंतु डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे येथे प्रचंड हाल होत आहेत. याठिकाणी डॉ वैष्णवी मालोदे सुट्टीवर गेल्याने शुक्रवारपासून आरोग्य वर्धिनी ओपीडी बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती आहे. आरोग्य व्यवस्था ढासळली असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. येथील दर्शनी भागात ओपीडी किती दिवस बंद आहे याची माहिती म्हणून साधे सूचना फलक देखील लावण्यात आले नसल्याचे निदर्शनास येते. रुग्ण उपचारासाठी आरोग्य वर्धिनीत आल्यानंतर त्यांना येथील पायºयावर बसून तासोनतास वाट पहावी लागते.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ मेहबूब कुरेशी यांच्याकडून माहिती घेतली असता ते आजारी असल्याने आरोग्य वर्धिनी केंद्र बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याठिकाणी येणाºया रुग्णांचा सर्व भार एकाच डॉक्टरवर असल्याने ते रजेवर आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे सध्या रुग्णांचे मोठ्याप्रमाणात हाल होत असून या रुग्णांना इतर रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. याबाबत आरोग्य वर्धिनीचे डॉक्टर वैष्णवी मालोदे यांच्याशी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांनी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मंगळवारपासून ओपीडी नियमित सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोग्य वर्धिनी बंद असल्याने नागरिकांचे आरोग्य रामभरोसे असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. या आरोग्य वर्धिनी केंद्रा बाहेर रुग्ण कौशल्या निमकर, रेखा बिसन, सुनिता मलेवार, लालचंद कापसे, गणेश आगाशे, आशा पशीने, अल्का चिंधालोरे, धनंजय बडवाईक, नितेश हेडाऊ, महेश देशमुख उपस्थित होते.