भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील पोलीस ठाण्याचा ०७१८३-२३२२०१ हा दूरध्वनी कित्येक दिवस बंद अवस्थेत आहे. मात्र याकडे प्रशासनाने पूर्णत: डोळेझाक केल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तुमसर पोलीस ठाण्याचे उदघाट्न न करता पोलीस उपविभागीय कार्यालय व पोलीस ठाणे नूतन इमारतीत स्थलांतर झाले. त्यामुळे सर्व यंत्रणा पुन्हा नव्याने उभारण्याचे काम पोलीस प्रशासनाला करावे लागले. अद्यापही काही यंत्रणा अपूर्ण अवस्थेत आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेला आपल्या अडीअडचणीच्या वेळी पोलिसांना संपर्क साधण्यासाठी येथील पोलीस ठाण्यात असलेला दूरध्वनी गेले कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत असल्याने एखाद्या वेळी पोलिसांची मदत अथवा काही घटनेबाबत दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समोरून दूरध्वनी बंद असल्याचा संदेश मिळतो. त्यामुळे एखाद्या घटनेबाबत माहिती देण्यास विलंब होतो. तुमसर पोलीस ठाणे व वरिष्ठ अधिकाºयांकडून जाणूनबुजूून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे पोलीस शहरात किंवा ग्रामीण भागातील परिसरात काही गुन्हा किंवा संशयित घटना घडल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करतात. तर दुसरीकडे मात्र गेल्या कित्येक दिवसांहून अधिक दिवस वारंवार बंद असलेला दूरध्वनी दुरूस्त करण्याची साधी तसदी प्रशासन घेत नाही. यावरून कायदासुवव्यवस्थेची भाषा करणारे तुमसर पोलीस प्रशासन किती जबाबदार आहे हे स्पष्ट होते, असे नागरिकांतून बोलले जात आहे. पोलीस प्रशासनाने याबाबतची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपविणे गरजेचे असून बंद असलेला दूरध्वनी त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मतानी यांनी आपला मोबाईल क्रमांक नागरिकांना दिला त्या धरतीवर येथील ठाणेदारांनी सुद्धा आपला मोबाईल क्रमांक नागरिकांना द्यावा जेणेकरून एखादी घटना घडल्यास नागरिकांना संपर्क करण्यास चांगले होईल. या प्रकरणी तुमसर चे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांना विचारले असता त्यानी कोणतीही पूर्वसूचना न देता बीएसएनएल आॅफिस मधुन सदर क्रमांक बंद आहे असे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. तरी नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावे असेही त्यानी या निमित्ताने आवाहन केले आहे.