नवतपापुर्वीच विदर्भ तापू लागला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नवतपा सुरू होण्यास अजून दोन दिवस बाकी आहेत. मात्र, वैदर्भियांना उन्हाचे चटके असह्य व्हायला लागले आहे. उष्णतेची लाट तीव्र होत चालली आहे. तापमानाचा पारा वेगाने चढत असून कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही वाढ होत आहे. त्यामुळे नवतपाच्या आधीच विदर्भाची ही स्थिती असेल, तर नवतपात उष्णता किती राहणार, असा प्रश्न आतापासूनच पडायला लागला आहे. विदर्भातील अकोला शहरात ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद बुधवारी करण्यात आली. विदर्भात एरवी उन्हाळ्यात प्रचंड तापमान असते. मात्र, यावेळी अधूनमधून अवकाळी पावसाचे डोकावणे सुरुच होते. त्यामुळे एप्रिलमधील काही दिवस वगळता उष्णता अशी जाणवलीच नाही. याउलट पावसाळा जाणवावा असा वादळीवाºयासह पाऊस झाला. मात्र, जितकेही दिवस विदर्भ तापला, त्यात कमाल तापमान चांगलेच वाढलेले होते. दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि आता पुन्हा विदर्भ तापायला लागला आहे. नवतपा सुरु व्हायचा असताना कमाल तापमानात दररोज वेगाने वाढ होत असून बुधवारी अकोला शहरात सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

विदर्भात उष्णतेची लाट असून कमाल तापमानाचा पारा झपाट्याने वर जात आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत. तापमानासोबतच उकाडा देखील वाढला असून घराबाहेर पडताच उन्हाचे चटके जाणवत आहेत. तर घर आणि कार्यालयात वातानुकूलीत यंत्रणा देखील काम करेनाशा झाल्या आहेत. मंगळवारी अकोला शहरात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती, तर बुधवारी हे तापमान ४४.८ अंशावर पोहोचले. मोसमी पावसाच्या आगमनाला आणखी बराच कालावधी असला तरीही एकीकडे अवकाळी आणि दुसरीकडे उन्हाचा कडाका अशा स्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात तर वाढ होत आहे. त्याचवेळी उकाड्यामुळे देखील नागरिक अधिक त्रस्त आहेत. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल तापमानात आणखी वाढ झाली. तर किमान तापमानातही तेवढ्याच वेगाने वाढ झालेली दिसून आली. बुधवारी अकोला शहरात सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यापाठोपाठ अमरावती ४३.४, ब्रम्हपूरी ४३.२, वर्धा ४२.९, यवतमाळ ४२.७, चंद्रपूर व गडचिरोली ४२.२, भंडारा ४२.१, नागपूर ४१.२, बुलढाणा ४०.५, वाशिम ४०.२ तर गोंदिया ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *